अमेरिकेने वाढवला भारताचा तेलपुरवठा, भारताला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 02:54 AM2019-05-04T02:54:54+5:302019-05-04T02:55:15+5:30
आखाती देशांतही भाव घटले : संभाव्य टंचाईला तोंड देण्याची ताकद वाढली
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : इराणकडून तेल खरेदीवर निर्बंध आल्यामुळे भारतात तेलाचे भाव वाढण्याची भीती असताना अमेरिकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेने भारताला जवळपास दोन दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातील संभाव्य टंचाईला मोठ्या प्रमाणावर तोंड देता येईल.
अमेरिकेकडून भारताला निर्यात वाढणार हे पाहता आखाती देशांतही तेलाच्या भावात घट व्हायला सुरुवात झाली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अमेरिका आणि आखाती देशांतील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत व तेलाची संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी सगळ्या पर्यायांचा विचार करीत आहोत.
सूत्रांनुसार अमेरिकेने भारताला सांगितले की, गरज भासल्यास तुम्हाला दरवर्षी दोन दशलक्ष बॅरल तेल अतिरिक्त मिळू शकते. भारताने नुकतेच म्हटले होते की, इराणकडून तेल आयातीवर असलेल्या निर्बंधांमुळे आमच्या अर्थव्यवस्थेवर नकरात्मक परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अमेरिकेने इराणकडून तेल आयातीसाठी सूट द्यायला हवी. भारताने अमेरिकेलाही म्हटले होते की, तुमच्याकडून आम्हाला निर्यात वाढवावी.
अमेरिकेने भारताला अतिरिक्त २ दशलक्ष बॅरल तेल देण्यासाठी उचललेल्या पावलांना पाहता आखाती देशांनी तेलाचे भाव कमी केले आहेत. एक अधिकारी म्हणाला की, तेथे जवळपास बॅरलमागे २ डॉलर कमी आहे. हे पाहावे लागेल की ही किती टिकाऊ घट आहे. जर भावातील ही घट पुढेही बघायला मिळाली तर ते आमच्यासाठी चांगले असेल. आमचा प्रयत्न असा आहे की, आम्ही सगळ्या पर्यायी स्रोतांकडून तेल मिळवण्याचा प्रयत्न करू.
इराणकडून तेल खरेदीवरील अमेरिकेच्या निर्बंधांनंतर आम्ही सौदी अरेबिया, यूएई आणि इतर सगळ्या देशांकडून तेलाच्या अतिरिक्त खरेदीसाठी पावले उचलली आहेत. तरीही जवळपास ६-७ दशलक्ष बॅरलची कमी असेलच. या परिस्थितीत जर अमेरिकेकडून आम्हाला तेल मिळत असेल तर ते आमच्यासाठी चांगले संकेत आहेत.
हेही आहेत पर्याय
रशियासोबत रुबल-रुपयात व्यवहार सुरू करण्यावर विचार. असे झाल्यास तेलाचा मोठा बाजार भारतासाठी उपलब्ध होऊ शकतो.
चीनसोबतही तेल मागविण्यासाठी प्रयत्न सुरू.
दक्षिण आफ्रिकी देशांकडून तेल आयात वाढविण्यावर विचार.