भारत-पाकदरम्यान अणुयुद्धाची अमेरिकेला भीती
By admin | Published: June 2, 2016 02:52 AM2016-06-02T02:52:39+5:302016-06-02T02:52:39+5:30
भारत आणि पाकिस्तानातील पारंपरिक संघर्षाची परिणती अण्वस्त्रांचा उपयोग करण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना अमेरिकेने उभय देशांनी चर्चा सुरू ठेवू
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानातील पारंपरिक संघर्षाची परिणती अण्वस्त्रांचा उपयोग करण्यात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करताना अमेरिकेने उभय देशांनी चर्चा सुरू ठेवून अधिकाधिक संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
‘आम्ही दक्षिण आशियातील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र विकासाबाबत आम्ही चिंतीत आहोत’, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक डॉ. अब्दुल कदीर खान यांच्या अलीकडील एका वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रवक्ता बोलत होता. पाच मिनीटांत दिल्लीला लक्ष्य बनविण्याची पाकिस्तानकडे क्षमता आहे, असे डॉ. खान यांनी म्हटले होते.
भारत-पाकमधील द्विपक्षीय संबंधात सुधारणा झाल्याने प्रदेशात शाश्वत शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.