अमेरिकी खासदारांनी मोदींना पत्र पाठविणे दुर्दैवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2016 03:14 AM2016-03-01T03:14:56+5:302016-03-01T03:14:56+5:30
अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे
नवी दिल्ली : अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
‘प्राचीन काळापासून सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेशी कटिबद्ध असलेला अनेकत्ववादी समाज म्हणजे भारत, अशी प्रशंसा करताना या काँग्रेस सदस्यांनी हिंसाचाराचे उदहारण देण्यासाठी काही मोजक्या घटनांची निवड करणे दुर्दैवी आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेच्या खासदारांनी २५ फेब्रुवारी रोजी मोदींना हे पत्र लिहिले होते, ते टॉम लॅन्टोस मानवाधिकार आयोगाने प्रसिद्ध केले. ‘भारतीय धार्मिक अल्पसंख्यक समाजाच्या सदस्यांविरुद्धचा वाढता हिंसाचार व असहिष्णुतेबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो. या धार्मिक अल्पसंख्यकांविरुद्ध हिंसाचार माजविणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलण्याची विनंती आम्ही तुमच्या सरकारकडे करीत आहोत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)१७ जून २०१४ रोजी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील किमान ५० ग्राम पंचायतींनी एक ठराव मंजूर करून सर्व बिगर-हिंदू धर्मीयांचा प्रचार, प्रार्थना आणि भाषणावर बंदी घातली होती,’ असे या पत्रात म्हटले आहे.
हा ठराव मंजूर झाल्यानंतर ख्रिश्चन धर्माचे आचरण करणे हा गुन्हा ठरला आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या जमावाने सिरीगुडा गावातील ख्रिश्चनांवर हल्ला करून सहा जणांना जखमी केले.ही बंदी घालण्यात आल्याने ख्रिश्चनांवर हल्ला करणे, सरकारी सेवा नाकारणे, खंडणी वसूल करणे, गावातून हाकलण्याची धमकी देणे, अन्न आणि पाणी नाकारणे आणि हिंदू धर्मात येण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोपही या खासदारांनी केला आहे. गोहत्या केल्याच्या आरोपावरून काही मुस्लिमांची कशी हत्या करण्यात आली, याचाही उल्लेख या पत्रात केला आहे.