अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:57 AM2020-02-24T03:57:21+5:302020-02-24T06:27:57+5:30

मोदींसोबत रोड शो व ‘नमस्ते ट्रम्प’चा धमाका

US President Trump visits India from today | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी

googlenewsNext

नवी दिल्ली/अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले. सुमारे १४ तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी ११.३० वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचेल.

ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत. दुसरे असे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. ट्रम्प यांच्या एकूण ३६ तासांच्या दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैेकी मंगळवारी दुपारी दिल्लीत ट्रम्प व मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौºयाच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे.

अहमदाबादमध्ये होणारा मोदी व ट्रम्प यांचा रोड शो व त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम हे या दौºयाचे दृश्य स्वरूपातील मुख्य आकर्षण असणार आहे. गेल्या वेळी मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांनी मोदींच्या सन्मानार्थ ह्यूस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ हा भपकेबाज कार्यक्रम केला होता. तेव्हा मोदी व ट्रम्प यांना परस्परांविषयीच्या प्रेमाला व मैत्रीला आलेले भरते पाहून संपूर्ण जग थक्क झाले होते.

मोटेरा स्टेडियममध्ये होणारा कार्यक्रम ही ह्यूस्टनच्याच कार्यक्रमाची अधिक रंगारंग आवृत्ती असेल. ह्युस्टनमधील ४७ हजारांच्या तुलनेत मोटेरामध्ये सुमारे लाखाची उपस्थिती अपेक्षित आहे. याआधी विमानतळापासून स्टेडिमपर्यंत ट्रम्प व मोदी यांचा निरनिराळ््या मोटारींच्या ताफ्यांमधून सुमारे ९ किमी लांबीचा रोड शो करतील.

वाटेत रस्त्याच्या दुतर्फा लाखो नागरिक ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभे राहतील व २२ ठिकाणी उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठांवर शेकडो कलावंत गुजरातसह भारताच्या १५ राज्यांमधील कलाविष्कार पाहुण्यांसाठी सादर करतील याची चोख व्यवस्था करण्यात आली
आहे. जाताना काहीशी वाट वाकडी करून महात्मी गांधींच्या साबरमती आश्रमासही धावती भेट देतील.

सोमवारी रात्री मुक्कामाला दिल्लीत जाण्याआधी ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबिय जगातील आश्चर्य मानले जाणारा ताजमहाल मावळत्या सूर्याच्या साक्षीने पाहण्यासाठी आग्र्याला जातील. ट्रम्प यांची ताजमहाल भेट पूर्णपणे खासगी असेल व त्यावेळी त्यांच्यासोबत यजमानांपैैकी कोणी नसेल.

मंगळवारी रात्री पुन्हा मायदेशी रवाना होण्यापूर्वी दिवसभर ट्रम्प यांचा दिल्लीत भरगच्च कार्यक्रम असेल. मोदी-ट्रम्प भेटीनंतर दुपारी संरक्षण, व्यापार, अंतर्गत सुरक्षा याखेरीज अन्य क्षेत्रांतील व्दिपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी किमान पाच-सहा करार व सामजस्य करार होणे अपेक्षित आहे. त्यानंतर अमेरिकी वकिलातीत मोदी व्यापारी व औद्योगिक प्रतिनिधीमंडळांशी भेटीगाठी घेतील.

स्वागतास भारत आतूर
ट्रम्प यांच्या बेटीनिमित्त केलेल्या टष्ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारत आतूर आहे. ते उद्या आमच्यासोबत असतील व त्यांच्या दौºयाची सुरुवात अहमदाबादमधील ऐतिहासिक कार्यक्रमाने होईल हे आम्हाला गौरवास्पद आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारताचा हा दौरा करण्याचे मी फार दिवसांपासून ठरविले होते व मी त्याची उत्सुकतेने वाट पाहात आहे. तेथे (अहमदाबादमध्ये) होणारा कार्यक्रम न भूतो असेल असे मला त्यांच्या पंतप्रधांनी सांगितले आहे. मोदी माझे चांगले मित्र आहेत व आमचे दोघांचे जांगले जुळते.
- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

स्वागत कमानी कोसळल्या
मोटेरा स्टेडियमचे मुख्य प्रवेशव्दार आणि त्याच्या थोडे पुढे उभारण्यात येत असलेल्या दोन स्वागतकमानी रविवारी दुपारी जोरदार वाºयामुळे कोसळल्या. लोखंडी पाईपच्या सांगाड्यावर फ्लेक्सचे बॅनर व फलक लावून या कमानी उभारल्या जात होत्या. सामानाचे वजन फारसे नसल्याने व रहदारीही नसल्याने कोणाला इजा झाली नाही.

कसा असेल कार्यक्रम?
सोमवार
स. ११.४० । अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन
दु. १२.१५ । साबरमती आश्रमास भेट
दु. १.०० । मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम
दु. ३.३० । आग्ºयाकडे रवाना
सा. ५.३० । ताजमहालला भेट
सा.६.४५ । दिल्लीकडे प्रस्थान
सा. ७.३० । दिल्लीत आगमन

मंगळवार
स.१०.०० । राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत
स.१०.३० । राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली
स.११.०० । हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट
दु. १२.४० । हैदराबाद हाऊसमध्ये करारांवर स्वाक्षºया व वृत्तपत्रांना निवेदन
सा. ७.३० । राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेट
रा. ८.०० । मायदेशाकडे प्रयाण

Web Title: US President Trump visits India from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.