भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 05:49 PM2019-03-02T17:49:26+5:302019-03-02T17:50:21+5:30

भारतीय हवाई दलानं एफ-16च्या वापराचे पुरावे दिल्यानंतर अमेरिका आक्रमक

US Seeks Info on Pakistans Potential Misuse of F16 Jets Against India | भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

Next

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाविरोधात कारवाई करताना एफ-16 विमानांचा केलेला वापर पाकिस्तानला महागात पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी हवाई दलानं 27 फेब्रुवारीला एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे भारतीय हवाई दलानं 28 फेब्रुवारी पत्रकार परिषदेत दिले. एफ-16 नं आमरार मिसाईलचा वापर केल्याचे पुरावे भारतीय हवाई दलानं प्रसारमाध्यमांना दाखवले. यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या एफ-16 विमानांच्या वापराची अमेरिकेनं दखल घेतली आहे. 

पाकिस्ताननं एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे समोर आल्यानंतर अमेरिकेनं याबद्दलची अधिक माहिती मागवली आहे. 'याबद्दल माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची आम्हाला कल्पना आहे. अमेरिकेनं तयार केलेल्या एफ-16 विमानाचा पाकिस्ताननं भारताविरोधात वापर केला. अशा प्रकारचा वापर करून पाकिस्ताननं अमेरिकेसोबतच्या कराराचा भंग केला, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. त्यानंतर आम्ही याबद्दलचा तपशील मागवला आहे,' अशी माहिती अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं पीटीआयला दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं अमेरिकेसोबत झालेल्या कराराचा पूर्णपणे भंग केला आहे. आक्रमक कारवाई करताना एफ-16 चा वापर करायचा नाही, या विमानाचा वापर केवळ दहशतवाद्यांविरोधात करायचा, अशा अटी या करारात आहेत. 

'पाकिस्तानसोबत एफ-16 सोबत झालेला करार गोपनीय असल्यानं त्यामधील अटी आम्ही जाहीर करू शकत नाही,' अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते कोन फॉकनर यांनी दिली. गुरुवारी (28 फेब्रवारी) भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पाकिस्ताननं कारवाई करताना एफ-16 चा वापर केल्याचे पुरावे दिले. यावेळी पत्रकार परिषदेत आमरार मिसाईलचे अवशेष दाखवले. पाकिस्तानी हवाई दलातील सर्व विमानांचा विचार करता त्यातील केवळ एफ-16 विमानाकडे आमरार मिसाईल डागण्याची क्षमता असल्याचं हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी सांगितलं. 

एफ-16 विमानाचा वापर झाला नसल्याचा वापर पाकिस्तानकडून करण्यात आला होता. हा दावा हवाई दलानं खोडून काढला.  'प्रत्येक विमानाचा एक इलेक्ट्रॉनिक सिग्नल असतो. भारतीय संरक्षण दलांना मिळालेला सिग्नल एफ-16 सोबत जुळतो. पाकिस्तानचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी आम्हाला आमराम मिसाईलचे काही अवशेषदेखील सापडले आहेत. आमराम मिसाईल वाहून नेण्याची क्षमता केवळ एफ-16 विमानांमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एफ-16 विमानाचा वापर झाला होता, हे सिद्ध होतं,' असं कपूर पत्रकार परिषदेत म्हणाले होते. 
 

Web Title: US Seeks Info on Pakistans Potential Misuse of F16 Jets Against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.