'दहशतवाद्यांना आम्ही कदापी जिंकू देणार नाही, आमचा भारतीयांना पूर्णपणे पाठिंबा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:22 AM2018-11-27T09:22:24+5:302018-11-27T09:53:18+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारताची साथ दिली आहे.
नवी दिल्ली - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दहशतवादाविरोधातील लढाईत भारताची साथ दिली आहे. अमेरिकेने दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत दृढ निश्चयाने उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली. 'मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसोबत 166 निष्पाप लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही' असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
On the ten-year anniversary of the Mumbai terror attack, the U.S. stands with the people of India in their quest for justice. The attack killed 166 innocents, including six Americans. We will never let terrorists win, or even come close to winning!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 26, 2018
अमेरिकेने याआधी मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 35 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले. या हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून 35 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
हिंदीतही ही बातमी वाचा
(26/11 हमले की बरसी पर ट्रंप ने भारत के पक्ष में किया ट्वीट-'अमेरिका भारत के लोगों के साथ, आतंकवाद को जीतने नहीं देंगे')
मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून 35 कोटींचे बक्षीस https://t.co/FBRwfK8VnP#MumbaiTerrorAttack#MumbaiAttacks#America
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 26, 2018
अमेरिकेकडून 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण जखमी झाले होते.