अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 22:53 IST2025-04-16T22:50:30+5:302025-04-16T22:53:53+5:30
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताच्या दौऱ्यावर असतील.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
JD Vance's India visit: अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कार्यालयाने बुधवारी ही माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ वादामुळे जागतिक व्यापारात सुरु असलेल्या गोंधळादरम्यान, जेडी व्हान्स भारतात येत असल्याने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते बैठक देखील करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जेडी व्हान्स हे काही ठिकाणी भेटी देखील देणार आहेत.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान इटली आणि भारताच्या दौऱ्यावर असतील. या भेटीदरम्यान, ते त्यांच्या पत्नी उषा व्हान्ससह भारतात येतील, ज्या पहिल्यांदाच सेकेंड लेडी म्हणून भारताला भेट देत आहेत. यादरम्यान, जेडी व्हान्स पंतप्रधान मोदींना भेटतील. व्हान्स दाम्पत्य त्यांच्या तीन मुलांना भारतात घेऊन येण्याची अपेक्षा आहे आणि त्यांचे कुटुंब दिल्लीशिवाय जयपूर आणि आग्रा येथेही जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ यांनीही पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारत दौऱ्याची योजना आखली होती, परंतु त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला.
"उपराष्ट्रपती प्रत्येक देशाच्या नेत्यांसोबत सामायिक आर्थिक आणि भू-राजकीय प्राधान्यांवर चर्चा करतील," असे दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतात ते दिल्ली, जयपूर आणि आग्रा येथे भेट देतील. जेडी व्हान्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतील. व्हॅन्स आणि त्याचे कुटुंब भारतातील सांस्कृतिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांना देखील उपस्थित राहतील, असेही अमेरिकेच्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स २१ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींशी भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील, ज्यात टॅरिफचा मुद्दा आणि द्विपक्षीय व्यापार करारासाठी दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींचा समावेश असणार आहे.
दरम्यान, जेडी व्हान्स २२ ते २३ एप्रिल दरम्यान जयपूरला भेट देऊ शकतात. जेडी व्हान्स हे जंतरमंतर, आमेर किल्ला आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक पातळीपासून ते अमेरिकन दूतावासापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. बुधवारी, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावास आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आमेर किल्ल्यावरील सुरक्षेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी आमेर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. सुरक्षा अधिकारी सामान्य पर्यटक बनून आमेर किल्ल्याच्या सुरक्षेची पाहणी करत आहेत.