आधारकार्ड जपून वापरा, सरकारची महत्त्वाची सूचना; काळजी घेण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:01 PM2022-12-06T12:01:17+5:302022-12-06T12:01:37+5:30
आधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो
नवी दिल्ली : भारतीय अनन्य परिचय प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधारकार्ड धारकांसाठी काही विशेष सूचना जारी करताना आधारकार्ड खराब होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने कार्डधारकांना केले आहे.
पूर्वी खराब कार्डही चालायचे, आता नाही
अनेक लोक आधारकार्ड घड्या घालून ठेवतात. चुरगळा करतात. त्यामुळे कार्ड खराब होते. पूर्वी खराब आधारकार्डही चालून जात होते. कारण, केवळ १२ अंकी आधार क्रमांकच आवश्यक होता. आता मात्र आधारकार्ड अस्सल आहे का, याचीही पडताळणी वापरापूर्वी केली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड खराब होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्ड खराब झाल्यास हा त्रास हाेणार
आधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो. आधारकार्ड खराब असेल, तर क्यूआरद्वारे सत्यता पडताळणी अवघड होते. त्यामुळे महत्त्वाचे काम अडकून पडू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आधारकार्ड नीट जपून ठेवायला हवे, असे ‘यूआयडीएआय’ने म्हटले आहे.
अशी करा आधारकार्डची सुरक्षा
- आधारकार्ड लॅमिनेट करून घ्या. मुडपणार नाही, अशा जागी ठेवा.
- कामासाठी आधारकार्ड बाहेर काढले असेल, तर काम झाल्यावर ते इथे तिथे पडून राहणार नाही, याची काळजी घ्या. ते आठवणीने नेहमीच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा.
- आधारकार्ड छोट्या मुलांच्या हातात पडणार नाही, याची काळजी घ्या. मुले आधारकार्डला हानी पोहोचवू शकतात.
- आधारकार्ड अशा ठिकाणी ठेवा, जिथे उंदीर पोहोचू शकणार नाहीत.
- तुमच्याकडे प्लास्टिकचे आधारकार्ड असेल, तर ते तुम्ही आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. आधारकार्ड कागदाचे असेल, तर ते वॉलेटमध्ये अजिबात ठेवू नका.
- कागदाचे आधारकार्ड वॉलेटमध्ये खराब होऊ शकते.