सशस्त्र दलांत हल्ल्यांसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:46 AM2018-05-21T00:46:42+5:302018-05-21T00:46:42+5:30
नव्या पिढीची युद्धसज्जता; मानवरहित जहाज, हवाई वाहन आणि स्वयंचलित रोबो शस्त्रे
नवी दिल्ली : एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम सुरु केले आहे. यात मानवरहित टँक, जहाज, विमाने व रोबो हत्यारांचा समावेश असेल. नव्या पिढीच्या युद्धासाठी सज्जतेच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.
संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार म्हणाले की, तिन्ही दलात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यातील युद्धांसाठी हे आवश्यकच आहे. त्यांनी यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स योजनेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. सशस्त्र दल व खासगी क्षेत्रात एक मॉडेल म्हणून ते लागू केले जाईल. कुमार यांनी माहिती दिली की, नव्या पिढीच्या युद्धाची तयारी करताना तांत्रिक बाबी, स्वयंचलित आणि रोबोटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्य जागतिक शक्तींप्रमाणेच भारताकडूनही मानवरहित हवाई वाहने, मानवरहित जहाजे, मानवरहित रणगाडे, स्वयंचलित रोबो रायफलचा वापर केला जाईल.
बड्या देशांत आधीच सुरुवात
चीन व पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एआयचा उपयोग झाल्यास या सीमांवर संरक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांवरील दबाव कमी होऊ शकतो. चीन एआय तंत्रज्ञानासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. त्यांची २०३० पर्यंत एक केंद्र स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि यूरोपीय संघ एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.