दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा
By admin | Published: March 14, 2017 05:51 PM2017-03-14T17:51:18+5:302017-03-14T17:51:18+5:30
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आदेश
सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्ली महापालिकेच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हीएम) ऐवजी छापील मतपत्रिकेव्दारा आयोजित करा, त्यासाठी जी काही कायदेशीर औपचारिकता आवश्यक आहे, ती मंगळवार सायंकाळपर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाच राज्यात नुक त्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत, भाजपला अनपेक्षित यश मिळाल्यामुळे इव्हीएम मशिन्स हॅक झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला. संगणक प्रणाली ही सुरक्षित नसून त्यात कोणतीही गोष्ट हॅक होऊ शकते. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत अमेरिकेत व्हाईट हाऊ स देखील हॅकिंगपासून सुरक्षित राहू शकलेले नाही. वारंवार ही बाब सिध्द झाल्यामुळे मायावतींनी आरोप करताच अन्य पक्षांनी देखील त्यांना दुजोरा देत या मतदान पध्दतीवर आक्षेप नोंदवला. आयोगाने हे आरोप फेटाळले असले तरी गोवा आणि पंजाबमधे अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आम आदमी पक्षानेही इव्हीएम मतदानावर शंका व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी तमाम राजकीय पक्षांच्या शंकांची दखल घेत उपरोक्त आदेश मुख्य सचिवांना दिला आहे.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत छापील मतपत्रिकांचा वापर व्हावा अशी मागणी केली. दिल्ली सरकारतर्फेच दिल्ली महापालिकेच्या निवडणुका आयोजित केल्या जातात तथापि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर नेमकी काय भूमिका आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘आप’ चे प्रवक्ते संजयसिंग म्हणाले, पंजाबच्या निवडणुका जिंकणारा काँग्रेस पक्षही इव्हीएम मतदानाबाबत साशंक आहे. राजदचे लालूप्रसाद यांनीही जाहीरपणे इव्हीएम मतदान हॅक झाल्याची शंका व्यक्त केली आहे.भाजप जोपर्यंत विरोधी पक्षात होता भाजपचे नेते देखील पोटतिडकीने इव्हीएमच्या मतदानाबाबत शंका उपस्थित करायचे. उत्तरप्रदेशात अजूनही नगरपालिका व पंचायतीच्या निवडणुका मतपत्रिकेव्दाराच घेतल्या जातात. देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांना जर तंत्रज्ञान आधारीत मतदानाबद्दल शंका असेल तर मतपत्रिकेव्दारे निवडणूक घेण्यास काय हरकत आहे? असे संजय सिंग म्हणाले.