नोटांऐवजी चेक, क्रेडिट कार्डचा वापर करा- जेटली
By Admin | Published: March 27, 2015 11:39 PM2015-03-27T23:39:01+5:302015-03-27T23:39:01+5:30
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चेक व प्लास्टिक चलनाच्या (क्रेडिट, डेबिट कार्ड) वापराला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे केले.
नवी दिल्ली : काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चेक व प्लास्टिक चलनाच्या (क्रेडिट, डेबिट कार्ड) वापराला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी येथे केले.
अर्थव्यवस्थेची वृद्धी होत असताना काळ्या पैशाला आळा घालण्याचा एक उपाय आहे. हा उपाय म्हणजे अधिकाधिक लोकांनी कागदी नोटांचा वापर टाळून धनादेश व प्लास्टिक चलन वापरावे, असे जेटली म्हणाले. ते सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि.च्या स्थापनदिन सोहळ्यादरम्यान बोलत होते. ही कंपनी देशाचे कागदी चलन, नाणी, पदके आणि वजन-मापे तयार करते. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांत चलनाचे अधिकाधिक मूल्य हे १०० डॉलर किंवा ५० पौंड आहे. कागदी चलनाचा (नोटा) वापर कमी करून प्लास्टिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. याच दृष्टिकोनातून सरकार मोठ्या रोख व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. काही उपाय घोषितही केले गेले असून त्यामुळे रोकडचा वापर करणे कठीण बनले आहे. या उपायामुळे बेहिशेबी रकमेला आळा बसेल.
४२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जेटली यांनी काळ्या पैशांच्या समस्येविरुद्ध उपाययोजना केल्या असून त्यात मालमत्ता खरेदी किंवा इतर तत्सम व्यवहारात संबंधितांना रोख व्यवहार करण्यापासून परावृत्त करण्याचा समावेश आहे. सरकारने रोख व्यवहारावर निर्बंध घालताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
४एक लाख रुपयांवरील प्रत्येक खरेदी-विक्रीसाठी पॅन क्रमांक नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अचल मालमत्ता खरेदीसाठी २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांची उचल घेण्यास किंवा देण्यास बंदी घालण्यासाठी त्यांनी आयकर कायद्यात सुधारणा सुचविली आहे.