लष्करी कारवाईत इस्त्रोच्या 'कार्टोसॅट' उपग्रहाचा केला वापर
By admin | Published: September 30, 2016 11:57 AM2016-09-30T11:57:34+5:302016-09-30T14:12:06+5:30
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्त्रो'ची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ३० - भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्त्रो'ची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रोने अवकाशात पाठवलेल्या कार्टोसेट उपग्रहांच्या मालिकेतील (2C) उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांचा कारवाई दरम्यान लष्कराने उपयोग केला.
बुधवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत चार तास चालेल्या कारवाईत भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमधील सात दहशतवादी तळ उद्धवस्त करुन ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
आम्ही लष्कराला छायाचित्रे पाठवत असतो. अमुक एका दिवशी आम्ही हे छायाचित्र पाठवले ही माहिती आम्ही देऊ शकत नाही. पण लष्कराला आम्ही छायाचित्रे पाठवत असतो. कार्टोसेट उपग्रहाच्या छायाचित्रांचा मुख्य उद्देश हाच आहे अशी माहिती इस्त्रोमधील सूत्रांनी दिली.
कार्टोसॅट उपग्रहाचा दुहेरी उद्देशासाठी वापर करता येतो. कार्टोसॅट म्हणजे भारताचे आकाशातील नेत्र आहेत असे तज्ञांनी सांगितले. कार्टोसॅट २ सी मुळे भारतीय लष्कराच्या टेहळणी आणि प्रतिकारक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
या उपग्रहाकडून गरजेनुसार विशेष जागेची छायाचित्रे मिळू शकतात. कार्टोसॅटचा वापर फक्त छायाचित्रांपुरताच मर्यादीत नाही तर, हा उपग्रह विशेष संवेदनशील लक्ष्यांचे अवकाशातून चित्रीकरण करु शकतो. कार्टोसॅट मालिकेतील पहिला उपग्रह २००५ साली अवकाशात पाठवण्यात आला. २००७ मध्ये कार्टोसॅट -२A उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्टोसॅट -२A शेजारच्या देशातील क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती देतो.