समारंभात ‘मानपमाना’चा प्रयोग
By admin | Published: February 8, 2015 02:41 AM2015-02-08T02:41:46+5:302015-02-08T02:41:46+5:30
महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्यासह एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांना मान सन्मानाने न बोलाविल्याने व उद्घाटन समारंभात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रकाश बेळगोजी - बेळगाव
बेळगावचे प्रथम नागरिक महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्यासह एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांना मान सन्मानाने न बोलाविल्याने व उद्घाटन समारंभात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अगोदरच नाट्य परिषदेत बेळगाव सीमा प्रश्नचा ठराव संमत होत नसल्याने नाराज मराठी भाषिक संतप्त झाले. त्यांनी बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
शनिवारी सकाळी सी पी एड मैदानात ग्रंथ दिंडीचे आगमन होताच लागलीच उद्घाटन सोहळा सुरु झाला. त्यावेळी आयोजकांनी घाई गडबडीत बेळगावचे मराठी भाषिक महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्यासह किरण ठाकूर यांना मंचावर बोलावले नाही. त्यामुळे संतप्त मराठी भाषिक कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु झाला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणाबाजीस सुरुवातही केली. प्रकरण शांत झाल्यानंतरही शरद पवार यांच्या भाषाळावेळी अधून मधून कार्यकर्ते घोषणाबाजी करतच होते.
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि कार्यवाह दीपक करंजीकर यांनी महापौर आणि कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. पोलीसांनीही हस्तक्षेप केला. नंतर महापौर उपमहापौरांसह ठाकूरांना मंचावर घेण्यात आले.