भारताविरुद्ध अमेरिकन भूमीचा वापर; भारतीय समुदायाच्या नेत्यांची एफबीआयला माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 08:19 AM2024-03-15T08:19:42+5:302024-03-15T08:19:42+5:30
भारतीय अमेरिकन लोकांनी आपली नाराजी आणि असंतोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: कॅलिफोर्नियातील हिंदूंविरुद्ध वाढत्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांवर सिलिकॉन व्हॅलीमधील प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन लोकांच्या एका समूहाने न्याय विभाग, एफबीआय आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली आणि सांगितले की, अमेरिकेच्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे.
बैठकीदरम्यान, भारतीय अमेरिकन लोकांनी आपली नाराजी आणि असंतोष व्यक्त केला की, अमेरिकेतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. हिंदू आणि जैन प्रार्थनास्थळांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याच्या आव्हानात्मक समस्येचे निराकरण करण्यासाठी ही बैठक समाजाचे नेते अजय जैन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे दोन डझन प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन उपस्थित होते. डिपार्टमेंट ऑफ जस्टिस कम्युनिटी रिलेशन्स सर्व्हिसचे एफबीआय अधिकारी व्हिन्सेंट प्लेअर व पोलिस विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
भारतीय अमेरिकन लोकांविरुद्ध आणि विशेषतः हिंदूंच्या विरोधात द्वेषाच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे समुदायामध्ये खूप भीती आणि चिंता निर्माण झाली आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यगट तयार केला जाईल. हा गट प्रार्थनास्थळांवर सुरक्षा उपायांचा पाठपुरावा करेल, असे यावेळी मान्य करण्यात आले.