२८ हजार कोटींच्या औषध व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर, तीन क्रिप्टो कंपन्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 08:02 AM2022-10-29T08:02:28+5:302022-10-29T08:03:07+5:30
एफआययूने या संदर्भातील सविस्तर माहिती ईडी आणि आयकर विभागाला दिल्याचे समजते.
मुंबई : देशातील काही कंपन्यांतर्फे तब्बल २८ हजार कोटी रुपयांच्या औषधांचे व्यवहार हे क्रिप्टो करन्सीद्वारे झाले असून, हे व्यवहार अवैध असल्याची माहिती वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (एफआययू) दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग करणार आहे. एफआययूने या संदर्भातील सविस्तर माहिती ईडी आणि आयकर विभागाला दिल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, औषधाच्या खरेदी-विक्रीसाठी औषध निर्मिती कंपन्यांसाठी एक नियम-प्रक्रिया आहे. या कंपन्यांतर्फे देशांतर्गत होणारे व्यवहार हे भारतीय रुपयांत होतात तर आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्ये होतात. मात्र, काही प्रमुख औषध निर्मिती कंपन्यांनी औषधांच्या विक्रीसाठी आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या खरेदीसाठी केलेले व्यवहार हे क्रिप्टो करन्सीद्वारे केल्याची माहिती एफआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण २०० व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे व्यवहार प्रामुख्याने ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, नायजेरिया इथे झाल्याचीही माहिती आहे. औषध निर्मिती कंपन्यांना या व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये तीन क्रिप्टो करन्सी कंपन्या सक्रिय असल्याचे एफआययूच्या तपासात दिसून आले. तसेच या क्रिप्टो कंपन्यांच्या माध्यमातून औषध निर्मिती कंपन्यांनी तब्बल २८ हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचेही सकृतदर्शनी दिसून आले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी हे व्यवहार क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून केल्यानंतर त्याची कोणतीही माहिती कर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे या २८ हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर कर चुकवेगिरी झाल्याचेही दिसून आले आहे.
क्रिप्टोचा वापर का?
आयकर विभाग करचुकवेगिरीची चौकशी करणार आहे.
तर औषध निर्मिती कंपन्यांनी आपल्या व्यवहारांसाठी क्रिप्टो करन्सीचा वापर का केला?, या मागे त्यांचा मनी लॉड्रिंग करण्याचा हेतू होता का? या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयही या प्रकरणाचा तपास करणार आहे.