दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:42 AM2023-09-17T06:42:48+5:302023-09-17T06:43:21+5:30
चौथ्या दिवशी चकमक, अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा मारा केला
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्याच्या घनदाट जंगलातील अतिरेक्यांचा बीमोड करण्याची मोहीम शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा मारा केला. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी पळ काढणारे दहशतवादी ड्रोन फुटेजमध्ये दिसत आहे. त्यांचा खात्मा करेपर्यंत मोहीम सुरूच राहील, असे दिसते.
रियासी जिल्ह्यात एसआयएच्या धाडी
रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष तपास संस्थेने (एसआयए) जिल्ह्याच्या उंचावरील भागात शोधमोहीम राबविली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
घुसखोरीचा प्रयत्न आणि झाला खात्मा
बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील हातलांगा सीमावर्ती भागात लष्करी मोहिमेत तीन दहशतवादी ठार झाले. तिघेजण भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करताच सतर्क जवानांनी त्यांना आव्हान दिले आणि नंतरच्या चकमकीत त्यांचा खात्मा केला.
अधिकाऱ्यांचा दौरा
उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी चकमक झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाने युक्त पाळत प्रणाली आणि अत्याधुनिक शस्त्रे वापरण्यात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.