सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर लॉकडाऊन हटले तरी होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:55 AM2020-06-01T04:55:30+5:302020-06-01T04:55:47+5:30
सीएसईचे सर्वेक्षण : स्वत:चे वाहन घेण्याकडे लोकांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लॉकडाऊन पूर्णपणे हटविल्यानंतरच्या सहा महिन्यांपर्यंत देशातील लोक स्वत:च्या आरोग्य सुरक्षेच्या काळजीपोटी सार्वजनिक वाहतूक सेवेचा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात वापर करतील. आपल्या सोयीच्या वाहतूक साधनाने प्रवास करण्यावर त्यांचा भर असेल, असा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने एका सर्वेक्षणातून
काढला आहे.
देशातून कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर व लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर लोक वाहतुकीची कोणती साधने वापरण्याला प्राधान्य देतील, हा या सर्वेक्षणाचा विषय होता. त्यासाठी दिल्ली व एनसीआर परिसरातील सुमारे ४०० मध्यमवर्गीय व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांना या सर्वेक्षणाच्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आले.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांबाबत सीएसईने सांगितले की, लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर लोक आरोग्यसुरक्षा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर काही महिने टाळणार . मात्र लोकांना आता उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी आहे. फिजिकल डिस्टन्स पाळून रस्त्यावरून चालता आले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.
सुरक्षित प्रवासाला प्राधान्य
च्सीएसईने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३६ टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही. त्यातील २८ टक्के लोकांनी भविष्यात सुरक्षित प्रवास व्हावा तसेच आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी स्वत:ची कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
च्लॉकडाऊन उठविल्यानंतरच्या सहा महिन्यांत मेट्रो रेल्वेसेवेची प्रवासी टक्केवारी ३७ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत घसरेल. मात्र चारचाकी व दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची झाल्यास भविष्यात त्याने प्रवास करण्याचा मनोदय सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७३ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.