'मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणं ही काही स्पर्धा नाही, पण...'; राज ठाकरेंच्या विधानाची कर्नाटकच्या मंत्र्यांकडून दखल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:00 PM2022-04-04T18:00:47+5:302022-04-04T18:01:27+5:30
मशिदींवर भोंगे आणि स्पिकवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकमध्येही एका मंत्र्यानं याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
कारवार (कर्नाटक)-
मशिदींवर भोंगे आणि स्पिकवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकमध्येही एका मंत्र्यानं याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. कर्नाटकचे ज्येष्ठ मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी विद्यार्थी आणि रुग्णांचे हित लक्षात घेऊन मुस्लिम समुदायाला विश्वासात घेत या समस्येवर तोडगा काढला जावा असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतच पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मदरशांवरील भोंगे खाली उतरवले गेले नाहीत तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या विधानानंतर राज्यात राजकारण चांगलं पेटलं आहे.
राज ठाकरेंच्या विधानावर बोलताना ईश्वरप्पा यांनी मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणं ही काही स्पर्धा नाही आणि त्यामुळे समुदायांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, पण मुस्लिम नेत्यांनी हे स्पीकर्स त्यांच्या प्रार्थनास्थळांपुरतेच मर्यादित राहतील याची काळजी घ्यावी, असं मत व्यक्त केलं आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे असे ते म्हणाले.
"मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात राज ठाकरे किंवा श्री राम सेनेने केलेले प्रयत्न हे स्वाभाविकपणे मुस्लिम समाजाला विश्वासात घेऊनच केले पाहिजेत. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत विद्यार्थी आणि रुग्णांना याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून आहेत", असं मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मुस्लीम समुदाय प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकर वापरण्याची प्रथा प्रदीर्घ काळापासून पाळत आहे, परंतु यामुळे त्यांच्या स्वतःच्या मुलांसह विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना त्रास होत आहे. "हनुमान चालीसा स्पीकरवर जोरात वाजवायची ही स्पर्धा नाहीये. त्याच प्रकारे, यामुळे समुदायांमध्ये संघर्ष होईल", असं ते म्हणाले. त्यांच्या मते, मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी याबद्दल विचार केला आणि मशिदींमध्ये स्पीकर वापरला तर ते चांगलं होईल, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.