भाजपतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर; नवी प्रचारखेळी, तयार केले स्टीकर व मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 01:06 AM2020-09-07T01:06:44+5:302020-09-07T06:50:32+5:30
भाजपच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत.
पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपने केली आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपने तयार केले आहेत. त्याबद्दल नेटकऱ्यांनी समाजमाध्यमातून भाजपवर कठोर टीका केली आहे.
भाजपच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले ३० हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत.
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा भाजप ज्या पद्धतीने वापर करू पाहत आहे, त्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे, तर अनेकांनी भाजपला समर्थनही दिले आहे. एका नेटकºयाने टिष्ट्वटरवर लिहिले आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळवून द्यायचा असेल तर भाजपलाच मतदान करा. आणखी एका नेटकºयाने टीका करताना म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अनेक जण तारस्वरात बोलत आहेत. त्यामुळे भाजपला त्यातून राजकीय लाभ नक्कीच उठविता येईल. कदाचित कंगना राणावतला भाजपकडून निवडणुकीत उमेदवारीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वृत्तसंस्था)
शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवा
हरुण खान नावाच्या व्यक्तीने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या नावाचा वापर करून बिहारमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा भाजपचा विचार दिसतो. भावनिक मुद्यांवर नव्हे तर शिक्षण, आरोग्य, शेती व शेतकरी, बेकारी आदी महत्त्वाच्या मुद्यांवर या देशात निवडणुका लढविण्यात याव्यात.