काश्मिरात दहशतवादी संघटनांतर्फे लहान मुलांचा हिंसाचारासाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:30 AM2018-06-29T05:30:23+5:302018-06-29T05:30:26+5:30
काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे
संयुक्त राष्ट्रे : काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे. काही राज्यांत नक्षलवादीही अल्पवयीन मुलांचा असा वापर करीत आहेत, असेही संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अल्पवयीन मुले व हिंसाचार यांच्या संबंधातील वार्षिक अहवालामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना दोषी ठरवले आहे. पाकिस्तानात या संघटनांना आश्रय मिळत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. अशा दुष्कृत्यांसाठी जगभरातील विविध देशांमध्ये किमान १0 हजार अल्पवयीन मुलांना वापरण्यात येत असल्याचे हा अहवाल सांगतो.
एकूण वीस देशांतील अनेक दहशतवादी संघटना हिंसाचारासाठी अल्पवयीन मुलांचा हिंसाचारासाठी वापर करीत असून, त्यात भारत, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन, फिलिपाइन्स व नायजेरिया यांचा समावेश आहे. भारतीय लष्कर व दहशतवादी संघटना यांच्यातील हिंसक घटनांमध्ये मुलांचा बळी देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काश्मीरबरोबरच छत्तीसगड व झारखंड या राज्यांमध्येही असे
प्रकार घडले आहेत. छत्तीसगड व झारखंड या दोन राज्यांमध्ये नक्षलवादी गट अल्पवयीन मुलांना हिंसाचारात सहभागी करून घेत आहेत, त्यांना शस्त्रे देत
आहेत. त्यामुळे नक्षलवादीविरोधी कारवायांमध्ये लहान मुलांचाही
बळी जात आहे, असे हा अहवाल सांगतो. (वृत्तसंस्था)
भारतातील सरकारने लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, पाकिस्तानच्या आश्रयावर उभ्या असलेल्या अतिरेकी संघटना व नक्षलवादी गट यांच्यामुळे लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्या भागांतील शाळा बंद पडत आहेत, त्यांना आगी लावल्या जात आहेत वा शाळा पूर्णत: पाडल्या जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. भारत सरकारने गुन्हेगारांना शिक्षा करावी, त्यांच्याविरुद्ध मोहीम आखावी, पण अल्पवयीन मुले अशा संघटनांच्या जवळ जाणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत, असेही अहवालाद्वारे सुचविण्यात आले आहे.
पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण
पाकिस्तानातील मदरशांमध्ये शिकणाºया लहान मुलांना आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा ठपका ठेवताना, एका व्हिडीओचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मुलींच्या शाळांवर होणाºया हल्ल्यांची दखल घेत, पाकिस्तान सरकारने अशा शाळा व शिकणाºया मुलींना संरक्षण द्यावे, असे अहवालात म्हटले आहे.