डॉक्टर वेळेत येतात की नाही हे तपासण्यासाठी व्हॉट्स अॅपचा वापर
By admin | Published: February 8, 2016 01:35 PM2016-02-08T13:35:30+5:302016-02-08T13:35:30+5:30
सरकारी डॉक्टर वेळेवर रुग्णालयात येतात की नाही हे चेक करण्यासाठी व्हॉट्स अॅपचा उपयोग करण्याची अनोखी शक्कल चेन्नई महापालिकेने लढवली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ८ - सरकारी डॉक्टर वेळेवर रुग्णालयात येतात की नाही हे चेक करण्यासाठी व्हॉट्स अॅपचा उपयोग करण्याची अनोखी शक्कल चेन्नई महापालिकेने लढवली आहे. चेन्नई पालिका प्रशासनाच्या विभागीय वैद्यकीय अधिका-यांनी सकाळी ८ ते ८.३० या वेळेत किमान २ रुग्णालयांना भेटी देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक डॉक्टर्स, परिचारीका , फार्मासिस्ट्स तसेच अन्य कर्मचारी उशीरा येतात नी लवकर जातात अशी रुग्णांची तक्रार होती.
यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने व्हॉट्स अॅपचा वापर करण्याचा निर्णय शुक्रवारपासून घेतला आहे.
आता विभागीय वैद्यकीय अधिका-यांनी सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत किती कर्मचारी कामावर होते याचा फोटो घेऊन तो व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये टाकणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिका-यांना कोण वेळेवर आलं नी कोण उशीरा आलं हे रोजच्या रोज समजणार आहे.
यामुळे कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा कमी होईल अशी आशा आहे असं पालिकेच्या अधिका-याने सांगितले. यामुळे दांड्या कोण मारतं, उपस्थिती ठेवण्याच्या नोंदवहीत फेरफार कोण करतं आदी गोष्टींचाही उलगडा होईल असे त्यानं सांगितलं.