मोबाईल विकतानाची एक चूक बनली खून, आत्महत्या आणि एन्काऊंटरचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:41 AM2019-05-27T11:41:44+5:302019-05-27T11:42:28+5:30
शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला.
मेरठ : बऱ्याचदा नवीन मोबाईल घेण्यासाठी जुना मोबाईल विकण्यात येतो. उत्तर प्रदेशमधील युवक शुभम कुमारला जुना मोबाईल विकताना केलेली चूक महागात पडली आहे. या मोबाईलमुळे एक खून, एक आत्महत्या आणि पोलिस एन्काऊंटर घडले आहे. या घटनेमध्ये एक छोटी मुलगी तिच्या आईला मुकली आहे.
ही घटना मुजफ्फरनगरच्या गंगानहर कॅनॉलमध्ये घडली आहे. शनिवारी 35 वर्षीय महिलेने तिच्या 5 वर्षांच्या मुलासह कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, तिच्या मुलाला वाचविण्यात आले. या महिलेचा मृत्यू झाला. तपासामध्ये या महिलेचे माजी प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते.
ज्याला फोन विकला त्यानेच फोटो व्हायरल केले
या महिलेचा माजी प्रियकर शुभम कुमार याने त्यांचे फोटो डिलीट न करताच मेरठच्याच अनूज प्रजापती याला मोबाईल विकला होता. प्रजापतीने हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. खतौलीचे पोलिस अधिकारी हरिशरण शर्मा यांनी सांगितले की, महिलेच्या आत्महत्येपूर्वी तपासामध्ये एक फोन केल्याचे समोर आले होते. हा कॉल तिने तिच्या पतीला केला होता.
एक हत्या, एक आत्महत्या
या घटनेआधीच शुभमला फोटो लीक झाल्याची खबर मिळाली होती. यामुळे त्याने मित्रांसोबत मिळून प्रजापतीचा खून केला. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले फोटो पाहून या महिलेने शुभमला फोन केला होता. यामुळे संतापलेल्या शुभमने 23 मे रोजीच प्रजापतीला संपविले. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईलमुळे पोलिसांनी आरोपींचा छडा लावला. फोटो व्हायरल होण्यासोबतच या खूनातही महिलेचे नाव आल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एन्काऊंटर
मेरठ पोलिसांनी शुभमचा आणि त्याच्या मित्रांचा तपास सुरु केला. मात्र, नाकाबंदीवेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या 5 जणांना रोखायचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोघांच्या पायाला गोळ्या लागल्या. हे सर्वजन प्रजापतीच्या हत्येमध्ये पोलिसांना हवे होते.