उत्कल एक्स्प्रेस अपघातानंतर कारवाईला सुरुवात, 13 रेल्वे कर्मचा-यांचं निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:36 AM2017-08-31T11:36:36+5:302017-08-31T11:37:51+5:30
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ४0 हून अधिक जखमी झाले होते.
नवी दिल्ली, दि. 31 - उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ४0 हून अधिक जखमी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेला कनिष्ठ अभियंता आणि हॅमरमॅन यांच्यासहित 11 कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता अपघात झाला त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करत होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी अनधिकृतपणे देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु होती. 'इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी रेल्वे कर्मचा-यांचं निलंबन होण्याची ही पहिलीच वेळ आहे', अशी माहिती रेल्वे अधिका-याने दिली आहे.
निलंबनाची कारवाई सेक्शन 14 (II) च्या अंतर्गत करण्यात आली आहे. यानुसार कर्मचा-यांनी हलगर्जीपणा केला असल्यास तपास सुरु असतानाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अपील करण्यासाठी कर्मचा-यांकडे 45 दिवसांचा कालावधी आहे.
उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी रेल्वेने दिल्ली विभागातील चार रेल्वे अधिका-यांना निलंबित केलं आहे. यामध्ये एक वरिष्ठ विभागीय अभियंत्याचा समावेश होता. तपास कर्मचा-यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान दुसरीकडे चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे.
१९ ऑगस्ट रोजी उत्कल एक्स्प्रेस रुळांवरून घसरून २३ जण ठार झाले. त्यानंतर, पुन्हा उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात ७0 हून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी राजीनामा दिला होता.
त्यानंतर, काही तासांनी सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांनीही राजीनामाही सादर केला. मात्र, तो न स्वीकारता मोदी यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आहे. स्वत: सुरेश प्रभू यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, या अपघातांमुळे आपण अतिशय दु:खी आहोत. जखमी झालेल्यांचे, तसेच मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख पाहून मला त्रास झाला आहे. अपघात टळावेत व जनतेला चांगली रेल्वेसेवा मिळावी, यासाठी मी घाम गाळला व रक्त आटवले. रेल्वेत सुधारणेसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पावले टाकली. मात्र, अपघातांची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा सादर केला आहे.