गोवऱ्यांमधून निघालेल्या विषारी वायूमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:50 AM2021-06-23T09:50:19+5:302021-06-23T09:51:45+5:30
सिमेंटच्या दुकानाच्या बेसमेंटमध्ये काम करताना चौघे दगावले; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश
मोरादाबाद: उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये असलेल्या एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. सिमेंट दुकानाच्या बेसमेंटमध्ये चौघांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी तिघे एकाच कुटुंबातील आहेत. दिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजपूर केसरिया गावात हा प्रकार घडला. अर्धवट सुकलेल्या गोवऱ्यांमुळे निघालेल्या विषारी वायूमुळे हा प्रकार घडल्याची माहिती मोरादाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पवन कुमार यांनी दिली.
गोवऱ्यांमधून निघत असलेल्या विषारी वायूमुळे श्वासोच्छवासात अडचणी आल्यानं चौघांचा मृत्यू झाल्याचं परिस्थितीजन्य पुराव्यांमधून दिसून येत असल्याचं पवन कुमार यांनी सांगितलं. राजेंद्र (वय ५० वर्षे), त्यांचे मुलगे हरकेष (वय ३० वर्षे), प्रितम (वय २५ वर्षे) आणि त्यांचा नोकर रमेश (वय ४० वर्षे) सोमवारी रात्री जमिनीखाली असलेल्या सिमेंट दुकानात काम करत होते. तेव्हा हा प्रकार घडला.
राजेंद्र त्यांची मुलं आणि नोकरासह सिमेंटच्या दुकानात रात्री काम करत होते. रात्री ११ वाजता राजेंद्र यांची पत्नी त्यांना बोलवायला आली. मात्र तिनं वारंवार हाका मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिनं पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी बेसमेंटमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.