उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; मंत्र्यासह ८ आमदार सपामध्ये, अनेक नेत्यांनीही सोडला पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:48 AM2022-01-12T07:48:38+5:302022-01-12T07:48:59+5:30

ब्राह्मण आणि मागास वर्गाला एकत्र करण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न

In Uttar Pradesh, 8 BJP MLAs have joined the Samajwadi Party | उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; मंत्र्यासह ८ आमदार सपामध्ये, अनेक नेत्यांनीही सोडला पक्ष

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; मंत्र्यासह ८ आमदार सपामध्ये, अनेक नेत्यांनीही सोडला पक्ष

googlenewsNext

-शरद गुप्ता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांनी राजीनामा देत समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. हे सर्व आमदार बिगर यादव मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. गत एक महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या १२ झाली आहे. भाजपला यामुळे मोठा धक्का बसला आहे. 

योगी सरकारमध्ये सेवायोजन मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे आमदार रोशनलाल वर्मा, भगवती सागर, बृजेश प्रजापती, ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य आणि नीरज मौर्य यांनी राजीनामा देत सपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे मागास वर्गाचा एक मोठा चेहरा आहेत. कधीकाळी ते कांशीराम यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. २००७ ते २०१२ या काळात मायावती यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. नंतर बहुजन समाज पार्टी सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य बदायूंमधून भाजपच्या खासदार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते.

काय आहे रणनीती?

सपाकडे यादव आणि अल्पसंख्याक समाजाची मोठी वोट बँक आहे. यात जर मागास जाती आणि ब्राह्मण जोडले गेले तर त्यांना भाजपला हरविण्यात काहीही अडचण येणार नाही. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, संजय चौहान यांच्या जनवादी पार्टी, अपना दल (कृष्णा पटेल गट), केशवदेव मौर्य यांच्या महान दल, जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलासोबत आणि आपले काका शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) यांच्यासोबत आघाडी केली आहे.

यामुळे जिंकला होता भाजप

गत लोकसभा निवडणुकीत सपा - बसपाची आघाडी झाली होती. ज्या जागेवर बसपाने निवडणूक लढविली नाही त्या ठिकाणी त्यांच्या समर्थक जाटव समुदायाने भाजपला मतदान केले होते. त्यामुळे त्यांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली होती.

अनेक नेत्यांनी सोडला भाजप

गेल्या काही दिवसांत बदायूंमधील भाजपचे आमदार राधाकृष्ण शर्मा, सीतापूरचे आमदार राकेश राठौर आणि बहराईचच्या आमदार माधुरी वर्मा या समाजवादी पार्टीत दाखल झाल्या होत्या. त्यांच्याशिवाय माजी आमदार बृजेश मिश्रा आणि कांतीसिंह यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री अशोककुमार वर्मा आणि प्रयागराजमधून उमेदवार राहिलेले शशांक त्रिपाठी यांनीही भाजपला रामराम केला आहे.

गोव्यात आयाराम-गयारामची चलती

गोविंद गावडे यांनी अखेर मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा देत भाजपप्रवेश केला आहे. प्रियोळमधून भाजपच्या तिकिटावर ते येती निवडणूक लढविणार आहेत. गावडे हे यावेळीही अपक्ष लढणार की एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्कंठा होती. 
लोबोंनंतर राजीनामा देणारे ते दुसरे मंत्री ठरले आहेत. प्रियोळमध्ये त्यांच्या भाजपप्रवेशास स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.

डिलायलांचाही भाजपला रामराम 

मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला यांनीही भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला. डिलायला शिवोलीतून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मायकल यांनी पत्नीसाठी भाजपकडे शिवोलीत तिकीट मागितले होते. परंतु त्यांना ते मिळू शकले नाही. लोबोंनी काल सोमवारी मंत्रीपदाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

Web Title: In Uttar Pradesh, 8 BJP MLAs have joined the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.