उत्तर प्रदेशात 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे अन् मल्टीप्लेक्स, नियमावली जारी
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 13, 2020 05:19 PM2020-10-13T17:19:07+5:302020-10-13T17:22:24+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी आदेश जारी करत, 50 टक्के क्षमतेने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि गृह मंत्रालयाच्या नयमांचे पालन करणे बंधनकारक असेल. (Uttar Pradesh)
लखनौ - केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे (Cinema Hall) आणि थिएटर्स (Theater) पुन्हा एकदा खुली करण्यासाठी दिशा-निर्देश जारी केले आहेत. यानंतर आता, उत्तर प्रदेशाती योगी सरकारनेही मंगळवारी 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स सुरू करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी आदेश जारी करत, 50 टक्के क्षमतेने 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि थिएटर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि गृह मंत्रालयाच्या नयमांचे पालन करणे बंधनकारक असेल. याशिवाय, कंटेनमेंट झोनच्या बाहेरच चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स आणि थिएटर खुली करण्यास परवानगी असणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्ह्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत.
50 टक्के कॅपेसिटीने होणार सुरुवात -
पीव्हीआर (PVR), आयनॉक्स (Inox), सिनेपोलीस (Cinepolis) आणि मुक्ता सिनेमाज (Mukta Cinemas)यांच्यासह मल्टीप्लेक्स चालवणाऱ्या कंपन्या 50 टक्के कॅपेसिटीसह सुरुवात करायला तयार आहेत. यापूर्वी, सिनेपोलीस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपत म्हणाले, ‘आम्ही केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करतो. आमच्या 350 स्क्रीनपैकी जवळपास 75 टक्के स्क्रीन खुल्या राहतील.'
चित्रपट गृहांत सॅनिटायझेशनचे काम सुरू -
सध्या चित्रपटगृहांमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले, 'प्रेक्षकांच्या पृकृतिची पूर्ण काळजी घेण्याची तयारी आम्ही करत आहोत. त्यांनी न घाबरता यावे आणि चित्रपटांचा पूर्वी प्रमाणेच आनंद घ्यावा. मात्र, त्यांनाही आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक असेल.'
असे असेल सिटिंग अरेंजमेंट -
व्यवस्थापकांनी सांगितले, चित्रपटगृहांमधील सिटिंग अरेंडमेंट बदललेले असेल. आता प्रत्येक सीटनंतर दुसरे सीट रिकामे ठेऊनच प्रेक्षकांना बसवले जाईल. प्रत्येक शोनंतर संपूर्ण चित्रपटगृह पुन्हा एकदा सॅनिटाईझ केले जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे आणि गांभीर्याने केले जाईल.