उत्तर प्रदेशातही महाआघाडी?

By Admin | Published: November 16, 2015 12:16 AM2015-11-16T00:16:10+5:302015-11-16T00:16:10+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता उत्तर प्रदेशातही महाआघाडी स्थापनेसाठी भाजपेतर राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

Uttar Pradesh is also a great deal? | उत्तर प्रदेशातही महाआघाडी?

उत्तर प्रदेशातही महाआघाडी?

googlenewsNext

लखनौ : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता उत्तर प्रदेशातही महाआघाडी स्थापनेसाठी भाजपेतर राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाआघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने यासंदर्भात पुढाकार घेतला असून यादव याच महिन्यात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची राजदची इच्छा आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सिंग यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव लवकरच येथे येतील आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्रित करण्याचे प्रयत्न करतील.
लालूप्रसाद यादव आपल्या कुटुंबियांसह २१ नोव्हेंबरला इटावाच्या सैफई गावात जाणार आहेत. तेथे ते मुलायमसिंग यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्याचवेळी उभयतांमध्ये महाआघाडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये भाजपविरुद्ध सुरू झालेले वारे संपूर्ण देशात पसरविण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील वातावरणही या पक्षाला प्रतिकूल आहे. दोन्ही राज्यांमधील भाजपेतर पक्ष एकजूट झाल्यास केंद्रातही भाजपला हादरा बसेल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. काँग्रेसने येत्या २१ नोव्हेंबरला नोएडामध्ये ‘मिशन २०१७’ फत्ते करण्यासाठी आपल्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल; मात्र महाआघाडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधीच घेतील, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यदेव त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महाआघाडीच्या स्थापनेची शक्यता नाकारलेली नाही.
यादव रविवारी संतकबीरनगर जिल्ह्यातील सेमेरियावा येथे एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथे पत्रकारांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
सपाने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून १४५ जागांवर उमेदवार उभे केले होते, हे उल्लेखनीय.




 

Web Title: Uttar Pradesh is also a great deal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.