उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 04:12 PM2018-10-18T16:12:33+5:302018-10-18T17:06:42+5:30
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने आजारी असलेल्या तिवारी यांच्यावर दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एकेकाळचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या तिवारी यांचा आज जन्मदिन होता. जन्मदिनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Former UP and Uttarakhand CM ND Tiwari passes away at Max Hospital in Saket. #Delhipic.twitter.com/tavfHc73Bp
— ANI (@ANI) October 18, 2018
स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत नारायण दत्त तिवारी हे प्रजासमाजवादी पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतर काही काळाने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. दरम्यान, तिवारी यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तसेच उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंडचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले होते. तसेच १९८६ ते ८७ या काळात त्यांनी परराष्ट्रमंत्रिपद भूषवले होते. तर २००७ ते २००९ या काळात त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
१९९० च्या दशकात एन.डी. तिवारी यांना पंतप्रधानपदाचे तगडे दावेदार मानले जात होते. मात्र तेव्हाच्या स्पर्धेत पी. व्ही. नरसिंहराव त्यांना वरचढ ठरले. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत केवळ ८०० मतांनी पराभव झाल्याने त्यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली होती. पुढे १९९४ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी तिवारी काँग्रेसची स्थापना केली. मात्र काही वर्षांनी त्यांनी आपला पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन केला.