Asaduddin Owaisi : ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजा सापडला; असदुद्दीन ओवेसींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:45 AM2022-05-17T11:45:58+5:302022-05-17T11:48:17+5:30
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे.
काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेदरम्यान शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लीम पक्षाने हिंदू पक्षाचा हा दावा फेटाळून लावला आहे. यातच आता, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी, ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग नव्हे, तर कारंजा सापडा आहे. असे कारंजे प्रत्येक मशिदीत असतात, असा दावा केला आहे.
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा फेटाळत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मशीद कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत शिव लिंग नाही, तर कारंजा होता. एवढेच नाही, तर प्रत्येक मशिदीत कारंजे असतात, असेही ते म्हणाले.
न्यायालयाचा आदेश 1991 मध्ये तयार झालेल्या कायद्याविरोधात -
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे. यानंतर न्यायालयाने संबंधित स्थळ सील करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश 1991 च्या संसदेत तयार झालेल्या कायद्याविरुद्ध आहे. तसेच, जर मशिदीत शिवलिंग आढळून आले, तर ही बाब कमिश्नरने न्यायालयात सांगायला हवी होती.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, खालच्या न्यायालयाचा आदेश संसदेच्या 1991 च्या कायद्याचे उल्लंघन आहे. आपण 1991 चा आदेश मानणार नाही, असे पंतप्रधान मोदीनीं सांगून टाकावे. याशिवाय, केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, जर इतिहासावरच बोलायचे, तर 'बात निकली है, तो दूर तलक जाएगी.' बेरोजगारी, महागाई, वगैरेसाठी औरंगजेबच जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी नाहीत, औरंगजेबच आहे.