उत्तर प्रदेश विधानसभा : भाजपकडून ३० टक्के आमदारांना संधी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:54 AM2021-09-07T05:54:46+5:302021-09-07T05:55:18+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक : काँग्रेसही झाली सक्रिय
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विद्यमान आमदारांपैकी ३० टक्क्यांना व काही मंत्र्यांना संधी देणार नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीने उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन करून संभाव्य उमेदवारांबाबत गोपनीय सूचना गोळा करायला सुरुवात केली आहे.
राज्यातील वरिष्ठ मंत्र्याने नाव न सांगता ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, ‘भाजप नेतृत्वाने जी प्रारंभिक यादी तयार केली आहे त्यानुसार विद्यमान आमदारांतील जवळपास ३० टक्के घरी बसवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, यावेळी संधी न मिळणाऱ्यांत काही विद्यमान मंत्रीही आहेत.’
जातींच्या समीकरणात त्या भागात त्यांची प्रतिमा आणि नेतृत्वाबद्दल निष्ठा भाजपकडून उमेदवार बनविण्यासाठी आधार बनविला जात आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आपल्या कोअर ग्रुपशी चर्चा करून निवडणुकीच्या खूप आधी ४५ नेत्यांना म्हटले आहे की, तुम्ही आपापल्या क्षेत्रात जाऊन आतापासूनच निवडणुकीची तयारी करा. या ४५ जणांत विद्यमान आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समाविष्ट आहेत. काँग्रेसची दृष्टी शेतकरी, अल्पसंख्य आणि ब्राह्मण नावांवर असली तरी नावे निश्चित करताना क्षेत्रीय संतुलन आणि जातीय समीकरण केंद्र असेल.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षात अजून नावांबद्दल अनिश्चितता असल्यामुळे या दोन्ही पक्षांत संभाव्य उमेदवारांची अजून कोणतीही यादी तयार नाही.
महाराष्ट्रातून यूपीमध्ये ५० हजार जण जाणार प्रचारासाठी
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत प्रचारासाठी महाराष्ट्रातून ५० हजार उत्तर भारतीय जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशातून सुमारे तीन कोटी लोक रोजगारासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या उत्तर प्रदेशातील लोकांना संघटित करण्याची जबाबदारी श्वेता शालिनी यांना देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघटनप्रमुख सुनील बन्सल, उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांची भेट घेऊन निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केल्याचे कळते.