Uttar Pradesh Assembly Election 2022 : ED च्या अधिकाऱ्याची सोमवारी स्वेच्छानिवृत्ती, मंगळवारी भाजपने दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:09 AM2022-02-02T11:09:10+5:302022-02-02T11:11:44+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही.
लखनौ - राज्यातील 5 विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला काही जिल्ह्यांत आता लवकरच ब्रेक लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 10 फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण पाहायला मिळत आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात फोडाफोडीचं आणि जोडाजोडीचं राजकारण होत आहे. सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा यादवांना यादव कुटुंबापासून फोडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाने त्यांना उमेदवारी दिलीच नाही. तर, रिटा बहुगुणा यांच्या मुलाचंही तिकीट कापण्यात आलं आहे.
युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची अपर्णा यांची इच्छा होती, गेल्या काही काळापासून त्या या मतदारसंघात राबतही होत्या, मात्र, जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा भाजपाने आपल्या मंत्र्यालाच उमेदवारी देऊन टाकली आहे. योगी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेले बृजेश पाठक यांना भाजपाने लखनऊ कैंटमधून उतरविले आहे. ते गेल्यावेळी लखनौ मध्यचे आमदार होते. भाजपने लखनौसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, ईडीमधील माजी अधिकाऱ्याला तिकीट दिलं आहे.
ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सोमवारीच सिंह यांची स्वेच्छानिवृत्ती केंद्र सरकारने स्विकारल्याचं ट्विट त्यांनी स्वत: केलं होतं. सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचानालय म्हणजे ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.
राष्ट्र निर्माण की यात्रा में सहभागी बनाने के लिए श्री @narendramodi जी,श्री @AmitShah जी,श्री @JPNadda जी,श्री @myogiadityanath जी,श्री @swatantrabjp जी तथा समस्त भाजपा परिवार का हृदय से आभार।नयी भूमिका का निर्वहन मैं पूरे समर्पण भाव से कर सकूं ऐसी प्रभु श्रीराम से प्रार्थना है।
— Rajeshwar Singh (@RajeshwarS73) February 1, 2022
प्रयागराजच्या भाजपा खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला देखील भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळ मयंक जोशी हे सपामध्ये जाण्याची शक्यता आहे. रीटा या दोनदा या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या आहेत.
कँट मतदारसंघातून नवीन चेहरा
अपर्णा यादव या लखनऊ कँटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. 2017 च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रीटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजपच्या दोन्ही नेत्यांची मागणी फेटाळण्यात आली. लखनौ कँट विधानसभा मतदारसंघातून 2017 च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभेवर निवडून आल्यानंतर रिटा बहुगुणा जोशी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पोटनिवडणूक झाली ज्यात भाजपचे सुरेशचंद्र तिवारी विजयी झाले होते. यंदा, भाजपने कायदामंत्री असलेल्या बृजेश पाठक यांना येथून उमेदवारी दिली आहे.