Uttar Pradesh Assembly Election 2022: लवकरच हवेत उडणारी बस येणार, गडकरीचं भरसभेत जनतेला आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:11 AM2022-02-17T10:11:04+5:302022-02-17T10:12:47+5:30
उत्तर प्रदेशातील जनतेला संबोधित करताना गडकरींनी मोठी घोषणाच केली. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, हवाई बसचा डीपीआर तयार आहे, असे गडकरींनी म्हटले
प्रयागराज - देशातील 5 राज्यांत निवडणुका होत असून गोव्यात पहिल्या टप्प्यातच 40 जागांसाठी मतदान झाले आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे, त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत. तर, केंद्रीयमंत्र्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं नेहमीच कौतूक होतं. त्यामुळे, त्यांच्या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत बोलताना आता गडकरींनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे.
उत्तर प्रदेशातील जनतेला संबोधित करताना गडकरींनी मोठी घोषणाच केली. आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, हवाई बसचा डीपीआर तयार आहे, असे गडकरींनी म्हटले. प्रयागराज येथील सभेत बोलताना गडकरींनी उडत्या बससह, सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलांसह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलं. प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे गडकरींनी म्हटलं. माझ्या विभागाचा पैसा माझ्याकडे, मी कोट्यवधींच्या गोष्टी करतो, आपल्याकडे पैशाची कमतरता नाही, असेही त्यांनी म्हटले. या सभेत गडकरींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतूक केले. तसेच, युपीतील गुंडागर्दी संपविण्यात योगींचं मोठं योगदान असल्याचंही ते म्हणाले.
लखनऊ (उत्तर), उत्तर प्रदेश की जनसभा से लाइव। #यूपी_मांगे_भाजपा#Vote_For_BJPhttps://t.co/UjCKXHYHzB
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 15, 2022
उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार
उत्तर प्रदेशमधील रस्ते अमेरिकेप्रमाणे होणार असल्याचंही म्हटले. तसेच, आतापर्यंत झालेली कामे ही फक्त ट्रेलर असल्याचेही गडकरी यांनी म्हटले.
थ्री पाँईंट सीटबेल्टचा निर्णय
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट देणं बंधनकारक असेल. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत गडकरींनी याबद्दलची माहिती दिली. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.
जलमार्गातून होईल शेतमालाची वाहतूक
उत्तम साठवणुकीची व्यवस्था नसल्याने देशात दरवर्षी २२ हजार कोटींच्या कांद्याचे नुकसान होते. वाहतुकीच्या मर्यादा असल्याने निर्यातीवर बंधने येतात. त्यामुळेच जलमार्ग बांधण्यावर भर दिला जात असून, येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भातील कापूस मुंबईमार्गे निर्यात करण्याऐवजी थेट बांगलादेशला पाठविता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताकरिता संशोधनवृत्ती जोपासली पाहिजे, असेही नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.