UP Election Opinion Poll: उत्तर प्रदेशात हवा बदलतेय? योगींसाठी धोक्याची घंटा; मोदी-शाह यांची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:32 PM2021-12-21T12:32:40+5:302021-12-21T12:34:52+5:30
uttar pradesh assembly election 2022 opinion polls: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक; आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभा निवडणूक महत्त्वाची
नवी दिल्ली/लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपला फटका बसल्यास त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसू शकतात. त्यामुळेच सत्ताधारी भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेश दौरे वाढले आहेत. अनेक प्रकल्पांचं लोकार्पण सुरू आहे. बऱ्याच प्रकल्पांसाठी भूमिपूजन केलं जात आहे.
भाजप उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढत आहे. गेल्या वर्षभरात भाजपनं काही राज्यांत मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये तर तीन मुख्यमंत्री बदलले गेले. मात्र उत्तर प्रदेशात भाजपनं योगींवर विश्वास दाखवला आहे. मात्र त्यांना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे.
एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशातील ४२ टक्के लोकांनी योगींना मुख्यमंत्रिपदी पसंती दिली. तर ३५ टक्के लोकांना अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींना मुख्यमंत्रिपदी पाहण्याची इच्छा १३ टक्के लोकांनी व्यक्त केली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून योगींची लोकप्रियता काहीशी कमी होताना दिसत आहे, तर अखिलेश यांची लोकप्रियता वाढली आहे.
एबीपी न्यूज-सी व्होटरनं ९ डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या सर्व्हेक्षणात ४५ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. तर अखिलेस मुख्यमंत्री व्हावेत असं ३१ टक्के लोकांना वाटत होतं. त्यानंतर झालेल्या सर्वेक्षणांतून योगींची लोकप्रियता घटत असल्याचं दिसलं. सध्या ४२ टक्के लोकांना योगीच मुख्यमंत्रिपदी कायम राहावेत असं वाटतं. तर अखिलेश यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटणाऱ्यांचं प्रमाण ३५ टक्के आहे.