Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी, लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:48 PM2022-02-08T15:48:23+5:302022-02-08T15:58:51+5:30

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून लव्ह जिहादचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे.

Uttar Pradesh Assembly Election 2022 : What is special about BJP's manifesto? Scooty for girls, 10 years in prison for love jihad case | Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी, लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास

Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी, लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदानाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे सादर केले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपने उत्तर प्रदेशसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोककल्याण संकल्प पत्र या नावाने भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. त्यात, लव्ह जिहादच्या मुद्द्याचाही समावेश आहे. 

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून लव्ह जिहादचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे. जर उत्तर प्रदेशात भाजप निवडणूक जिंकून सत्तेवर येईल. तर, लव्ह जिहादप्रकरणात 1 लाख रुपये दंड आणि कमीत-कमी 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. अमित शहा यांच्याहस्ते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुरेश खन्ना यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 

युवकांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आयटीआय स्थापन करण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी होळी आणि दीपावलीच्या दिवशी 2 मोफत एलपीजी सिलिंडर दिले जातील. 60 वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. विधवा आणि निराधार महिलांसाठी निवृत्ती वेतन दरमहा 1,500 रुपये करण्यात येणार आहे, असे अमित शाह म्हणाले. तर, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थींनींना स्कुटी आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार असल्याचेही शहांनी म्हटले. 

भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे 

60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना मोफत प्रवास 

गरीब मुलींच्या विवाहासाठी 1 लाख रुपयांची मदत

शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज

5000 कोटींच्या खर्चातून शेतकऱ्यांसाठी जलसिंचन योजना

सरदार पटेल यांच्या नावाने अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर मिशन

1 कोटी महिलांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कमी व्याजदरात देणार

अभ्यूदय योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग

कन्या सुमंगलम योजनेत 15 ऐवजी 25 हजार रुपयांची मदत

बटाटा, टमाटे आणि कांद्याला हमीभाव देण्यासाठी 1000 कोटींची तरतूद 

पुढे बोलताना शहा म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रात सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी देईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोचिंगची व्यवस्था केली जाईल. 

महिला सुरक्षित, योगी आदित्यनाथ म्हणाले

राज्यातील 24 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन भाजपने हा जाहीरनामा तयार केल्याचं भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुरेश खन्ना यांनी म्हटले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, 2017 च्या जाहीरनाम्यातील 212 संकल्पांची सरकारने पूर्तता केली आहे. राज्यात आज कायद्याचं राज्य आहे. आई आणि मुलगी सुरक्षितपणे वावरत आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात युपीमध्ये शकडो दंगली झाल्या, महिनोंमहिने युपीत कर्फ्यू लागत असायचा. व्यापारी पळून जात होते, मुली शाळेत जायला घाबरत होत्या. मात्र, कर्फ्यू नसून आज धुमधडाक्यात कावड यात्रा निघत आहे, असे योगींनी म्हटले.

पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार 

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
 

Web Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 : What is special about BJP's manifesto? Scooty for girls, 10 years in prison for love jihad case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.