Uttar Pradesh Assembly Election: पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:50 AM2022-01-22T06:50:39+5:302022-01-22T06:51:20+5:30
शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत.
- राजेंद्र कुमार
लखनौ : शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत.
भाजपचे आमदार विक्रम सैनी यांना काही दिवसांपूर्वी मुनव्वरपूर गावात ग्रामस्थांच्या मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. या निवडणुकीबद्दल मुजफ्फरनगर जिल्ह्याचे प्रमुख जाट नेता सुधीर बालियान म्हणतात की, ‘यावेळी हिंदुत्वाची लाट दुबळी झाली आहे. भाजपचे आमदार आणि सरकार दोघांबद्दल जनतेत नाराजी आहे. जाटांनी याआधी एकतर्फी भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता तशी स्थिती नाही.’
मेरठ येथील वरिष्ठ पत्रकार सुरेंद्र सिंघल यांनी शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा आरएलडीला राजकीय संजीवनी दिली आहे. जयंत चौधरी यांनी शेतकरी आंदोलनात जाट समाजात आपले पाय रोवले आहेत.
अमित शहा करणार प्रचार
मेरठमध्ये असे म्हटले जात आहे की, ‘आता भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुख्य प्रवाहात आणण्याची सगळी जबाबदारी अमित शहा यांच्या प्रचारावर अवलंबून राहील. अमित शहा पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मार्ग किती सोपा करतात हे दिसेल.’