Uttar Pradesh Assembly Election: भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; यूपीत जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:35 AM2022-01-22T06:35:38+5:302022-01-22T06:36:04+5:30
भाजपचा प्रतिसाद नाही; आम्ही स्वबळावर लढू : त्यागी
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जनता दलात (संयुक्त) जागा वाटपाची बोलणी शेवटच्या प्रयत्नांतही अपयशी ठरली. उत्तर प्रदेशमध्ये २००७ मध्ये भाजप व जनता दलाने (संयुक्त) निवडणूक एकत्र लढविली होती. ते लक्षात घेऊन भाजपने बिहारमध्ये राष्ट्रीय लाेकशाही आघाडीत (रालोओ) सहभागी असलेल्या आमच्या पक्षाला सामावून घ्यावे, अशी जनता दलाची (संयुक्त) इच्छा आहे. तेव्हा जनता दलाने (संयुक्त) २२ जागा लढवून २ जिंकल्या, तर भाजपने ४५. मायावतींनी सत्ता स्थापन केली होती.
जनता दलाने (संयुक्त) आपले वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांना भाजपसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु, वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि आम्हाला स्वबळावर लढावे लागू शकेल, असे जनता दलाने (संयुक्त) म्हटले. जनता दलाचे (संयुक्त) सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना ‘आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५० जागा मागत आहोत आणि यावर चर्चा करण्याची इच्छा आहे. भाजपने विचार करून शक्तिशाली आघाडी करावी. परंतु, तसे काही दिसत नाही.” असे म्हटले. आर.सी.पी. सिंह हे भाजप आणि अमित शाह, राजनाथ सिंग, जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान या वरिष्ठ नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. परंतु, या क्षणी तरी काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. जनता दलाला (संयुक्त) ५० पेक्षा कमी जागांवरही तडजोड करायची होती, असे त्यागी म्हणाले. भाजप उत्तर प्रदेशमधील नितीश कुमार यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद न देण्यामागील एक कारण हे बिहारमध्ये जनता दलाशी (संयुक्त) वाढते मतभेद हे आहे. हे मतभेद विधान परिषद निवडणुकीसाठी जागा वाटप, दारूबद्दलचे धोरण आणि इतर विषयांवर आहेत.
अहंकार निर्माण झाला : भाजप उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करण्यास का प्रतिसाद देत नाही, असे विचारल्यावर त्यागी म्हणाले, ‘स्वबळावर निवडणूक जिंकण्याएवढा अहंकार भाजपला निर्माण झाला आहे.’