Uttar Pradesh Assembly Election: ‘योगीं’चा दरबार आणि अंगठेबहाद्दर बायकांचा ‘पंगा’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 09:49 AM2022-01-16T09:49:29+5:302022-01-16T09:51:46+5:30
सात वर्षांपूर्वी गोरखपूरच्या मंदिरात भेटलेल्या योगी आदित्यनाथांच्या दरबाराचा आँखो देखा हाल आणि महाराजगंजमधल्या ग्रामीण बायकांनी थेट आमदार-खासदारांशी घेतलेल्या पंग्याची कहाणी..
- समीर मराठे, वृत्तसंपादक, लोकमत
जुलै २०१४.
सात वर्षं होऊन गेली.
सकाळची वेळ. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरातील प्रशस्त आवार. शेकडो लोक दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या आवारात मात्र एकाच ठिकाणी खूप लोक एकत्र आले होते. त्यांच्या हातांत पिशव्या होत्या, कागदपत्रं होती. चेहऱ्यावर चिंता होती. या घोळक्यात बायका होत्या, पुरुष होते, तरुण होते, काहीजण कुटुंबासह आले होते. कोणाची तरी वाट पाहत ताटकळत उभे होते. काहीजण तर सकाळी सहा वाजल्यापासूनच आपला नंबर केव्हा येईल, याची आतुरतेने वाट पाहत ताटकळलेले होते.
ही गर्दी प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी ! एक म्हणजे गोरखनाथ मंदिराचं दर्शन आणि दुसरं म्हणजे ‘महाराजांचं’ दर्शन. थोड्याच वेळात ‘महाराज’ आले आणि एकच गोंधळ उडाला. महाराजांचे ‘शिष्य’ सगळ्यांना आवाज बंद करायला सांगू लागले. रांगेतले लोकही चूपचाप. या गर्दीत मीही घुसलो. तिथे शेजारीच एक मोठ्या हॉलमध्ये अनेक लोक बसलेले. हा महाराजांचा ‘जनता दरबार’! प्रत्येकाकडे पिशव्या, कागदांची भेंडोळी... आतमध्ये दोन टायपिस्ट बसले होते. महाराज आल्या-आल्या स्थानापन्न झाले आणि लगेच त्यांनी आपलं काम सुरू केलं. भगवी वस्त्रं. चेहरा करारी. एक-एक करीत जो-तो आपलं गाऱ्हाणं सांगत सुटला. कोणाला रेशनकार्ड हवं, कोणाला अव्वाच्या सव्वा विजेचं बिल आलेलं, कोणाचं पेन्शनचं काम रखडलेलं, कोणाला सरकारी अनुदान हवं, कोणाला घरकुल!
‘महाराज’ सगळ्यांचं ऐकून घेत आणि तातडीनं आपल्या ‘शिष्यांना’ त्याबाबत सांगत. आवाजात आणि नजरेतही जरब. हे शिष्यही लगेच अर्ज लिहून देत होते, टाइप करून देत होते, कोणाला भेटायचं हे सांगत होते, ‘महाराजांचं नाव सांगा, तुमचं काम होईल’, म्हणत होते. काही प्रकरणात स्वत: महाराजही काही अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत होते... हे इतक्या शिस्तीत आणि झपाट्यानं चाललेलं की, दोन ते पाच मिनिटांत महाराजांसमोरचा माणूस पुढे सरकत होता.
गर्दी कमी झाल्यावर थोड्या वेळानं मीही हॉलमध्ये गेलो. ‘शिष्यां’नी लगेच अडवलं.. ‘लाइन में आओ...’ मी त्यांना माझी ओळख सांगितली आणि म्हणालो, ‘माझं काहीच काम नाही. मी फक्त थोडा वेळ इथे बसेन आणि नंतर महाराजांची भेट घेईन.’ त्यांनी लगेच महाराजांना संदेश दिला. तेही थोडा वेळ थांबा म्हणाले आणि आपल्या कामाला लागले.
- सात वर्षांपूर्वीचे हे ‘महाराज’ म्हणजेच आजचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. त्यावेळी ते खासदार होते. मला म्हणाले, ‘गोरखपूर में काम की कमी नहीं है और भी बहुत काम करना है, गोरखपूर की छबी पूरे हिंदुस्तान में मुझे बदलनी है!’
- नंतर ते थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीच झाले...!
२०१४ च्या लोकमत‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाच्या लेखासाठी उत्तर प्रदेशच्या प्रवासात असताना अचानक झालेली योगी आदित्यनाथ यांची ही भेट ! आधुनिक जगाशी कुठलाही कनेक्ट नसलेल्या, अनेक ठिकाणी तर मोबाइलची रेंजही न पोहोचलेल्या खेड्यापाड्यातली माणसं कशाच्या आधारानं जगतात, कशी टिकून राहतात, जगण्यासाठीची ऊर्जा ते कुठून आणतात हे पाहाणं हा या लेखाचा विषय होता. ग्रामीण उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर, महाराजगंज या मागास भागात फिरत होतो. साऱ्याच गावांत महिलांचं प्राबल्य होतं, पुरुष तिथे खरोखर ‘नावालाच’; संख्येनंही आणि ‘अस्तित्वानं’ही ! अनेक घरांतील पुरुष माणसांनी रोजीरोटीसाठी घर सोडून शहरात, परराज्यांत स्थलांतर केलेलं ! त्यांच्या पश्चात तिथल्या बायकांनी आपलं घरच नव्हे, तर गावही चालवायला, सुधरवायला घेतलं होतं.
ज्या बाईच्या डोक्यावरचा पदर कधी खाली घसरला नव्हता, ज्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या; त्याच बायका अगदी तलाठ्यापासून ते पोलीस आयुक्त, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत होत्या. नियमांवर बोट ठेवून अधिकाऱ्यांना गप्प करत होत्या. आपल्या अधिकारांसाठी सजग झाल्या होत्या, सरकारी भ्रष्टाचार संपवायला निघाल्या होत्या... त्याचं एक वेगळंच आणि आश्चर्यचकित करणारं चित्र इथे पाहायला मिळालं. तिथल्या सामाजिक संस्थांनि दोनच गोष्टी इथल्या बायकांना सांगितल्या, ‘नरेगा’च्या माध्यमातून ‘कमावत्या’ व्हा आणि तुमचे हक्क समजून घेऊन कायद्याच्या पुराव्याचा कागद अधिकाऱ्यांच्या तोंडावर मारा.. या बायकांनी हेच केलं आणि बघता बघता गावं बदलत गेली. आपल्या घराजवळ रोजगार हमीची कामं त्यांनी हक्कानं मागून घेतली, त्यातून त्या आत्मनिर्भर झाल्या.
ग्रामपंचायत, पोलीस ठाणं, वीज मंडळाचं कार्यालय, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, रेशन दुकानं.. या साऱ्या ठिकाणी त्या ‘कायद्याचा कागद’ दाखवून दाद मागू लागल्या. ‘असं का?’ म्हणून प्रश्न विचारू लागल्या. ‘नरेगा’च्या माध्यमातून जो पैसा हाती आला, त्यातून जवळपास प्रत्येक बाईनं आपल्या पाेरांना शाळेत, काहींनी तर इंग्रजी शाळेत घातलं.. घरं आणि गावं बदलू लागली. त्यांचा घाबरट चेहरा आत्मविश्वासानं झळकू लागला. या बायका सांगत होत्या, हमने ‘बाबू’ को सिर्फ ‘कागज’ दिखाया, फिर किसी को घर मिला, किसी को पेन्शन, किसी को राशन ! गाँव मे सडक बनी, पानी की टंकी आयी, घर के पास ‘नरेगा’ का काम आया..
या अशिक्षित बायकांनी राजकारण्यांना, उमेदवारांनाही धारेवर धरायला सुरुवात केली, मतं मागायला आलेल्या उमेदवारांसाठी आपला लेखी अजेंडा तयार केला, त्यांना विचारायला सुरुवात केली.. बोला, निवडून आल्यावर काय काय करणार?.. लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार? महिलांच्या सन्मानासाठी जनतेचा आवाज बनणार? भ्रष्टाचार संपवणार? बिजली, सडक, पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी काम करणार?.. हे मान्य असेल तरच आम्ही तुम्हाला मत देऊ. करा या ‘कागदा’वर सही !.. ‘आश्वासन’ देऊनही काम केलं नाही, तर आम्ही आहोतच. हा ‘कागद’ घेऊन आम्ही तुमच्या घरावर मोर्चा काढू!”... आणि या बायकांनी खरोखरच तसं केलं !
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘प्रचाराचे मुद्दे’, आश्वासनं काहीही असू द्या, उमेदवारांचा पहिला सामना या अशिक्षित, अंगठेबहाद्दर बायकांशी असेल, हे नक्की !
sameer.marathe@lokmat.com