Uttar Pradesh Assembly Election: यूपीत आज भाजप मोठा धमाका करणार? समाजवादी पक्षाच्या घरातच स्ट्राईक करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:30 AM2022-01-16T11:30:23+5:302022-01-16T11:30:47+5:30
Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; पक्षांतर जोरात
लखनऊ: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक जवळ येऊ लागताच नाराज नेते मंडळी पक्ष बदलू लागली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या १४ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यापैकी तीन जण योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात होते. भाजपला रामराम केलेल्या बहुतांश आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपनं समाजवादी पक्षाच्या घरातच स्ट्राईक करण्याची तयारी केली आहे.
मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये लखनऊच्या कैंट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. भाजपच्या रिटा बहुगुणा जोशींनी त्यांचा पराभव केला. अपर्णा यादव यांना ६३ हजार मतं मिळाली. अपर्णा मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतिकची पत्नी आहे.
अपर्णा यादव यांनी अनेकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यादव यांना लखनऊच्या कैंट मतदारसंघातून तिकीट दिलं जाऊ शकतं. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तेव्हाच यादव भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.