Uttar Pradesh Assembly Election Results 2022: कमल फ्लाॅवर नहीं, फायर है फायर ! जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:35 AM2022-03-11T06:35:20+5:302022-03-11T06:36:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठ वर्षे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाच वर्षे अशा दुहेरी अँटीइन्कबन्सीवर मात करीत या दोघांच्या डबल इंजिनने उत्तर प्रदेशात इतिहास घडविला.

Uttar Pradesh Assembly Election Results 2022: Not lotus flower, BJP fire is fire! Schemes fell heavily on racial equations | Uttar Pradesh Assembly Election Results 2022: कमल फ्लाॅवर नहीं, फायर है फायर ! जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी

Uttar Pradesh Assembly Election Results 2022: कमल फ्लाॅवर नहीं, फायर है फायर ! जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 4-1 अशी खणखणीत बाजी मारली. पंजाबात मात्र आम आदमी पक्षाची अक्षरश: त्सुनामी आली. त्यात काॅंग्रेस, भाजप आणि अकाली दल हे सर्व पक्ष वाहून गेले. उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्याची किमया तब्बल 37 वर्षांनी साधली आहे. 

लोकसभेच्या यशाची पायाभरणी
- श्रीमंत माने
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठ वर्षे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाच वर्षे अशा दुहेरी अँटीइन्कबन्सीवर मात करीत या दोघांच्या डबल इंजिनने उत्तर प्रदेशात इतिहास घडविला. पूर्ण बहुमतासह राज्यात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर येत नाही, हा इतिहास बदलून टाकला. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत प्रबळ अशा पक्षसंघटनेला जाते. 

जातीय समीकरणांवर योजना पडल्या भारी
भाजपच्या निवडणूक यंत्रणेने समाजवादी पक्ष गठबंधनच्या रूपाने उभे राहिलेले तगडे आव्हान नुसतेच परतवून लावले नाही, तर दोन वर्षांनंतरच्या लोकसभा निवडणुकीतील यशाचीही जणू पायाभरणी केली. २०१७च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी धार्मिक ध्रुवीकरण नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशची निवडणूक पुन्हा परंपरागत जातीय समीकरणाकडे गेली. अखिलेश यादव यांना जातीय समीकरणाची मोट बांधण्यात यश आल्याचे चित्र, लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या, हाथरस - उन्नाव वगैरे महिला अत्याचाराच्या घटना, मुख्यमंत्री योगी यांनी ठाकूर समाजाला झुकते माप दिल्याचा आक्षेप,  कोविड काळात गंगेत वाहून जाणारी प्रेते अशी कितीतरी आव्हाने भाजपपुढे होती. तथापि,  कोविड महामारीच्या काळातील मोफत रेशन व लस, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना वगैरेंच्या लाभार्थ्यांचा नवा मतदारसंघ बांधण्यात भाजपला यश आले.

उत्तर प्रदेश सरकारचा उत्तम कारभार व राष्ट्रवादी विचाराला जनतेने पुन्हा विजयी केले आहे. धर्म व जातीपातीचे राजकारणही भाजपच्या यशामुळे पराभूत झाले आहे. भाजपचे कमळ केवळ फ्लाॅवर नसून फायर आहे...   - योगी आदित्यनाथ

सगळ्या आव्हानांवर बाहुबली ‘बुलडोझर’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांनी लाभार्थी चेतना अभियानाच्या माध्यमातून सरकार संकटकाळात गरिबांच्या पाठीशी उभे राहिल्याचा संदेश घरोघरी नेला. योगींचा बुलडोझर बाहुबलीवर चालतो, ही पाच वर्षांत राज्याची कायदा - सुव्यवस्था सुधारल्याची भावना मतदारांमध्ये तयार झाली आणि त्यापुढे सगळी आव्हाने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोलमडून पडली.

गोवा : प्रमोद सावंत होणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री 
- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात यावेळी केवळ भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली नाही, तर बहुरंगी लढत झाली. नव्या पक्षांच्या रुपात कथित सेक्युलर मतदारांसमोर यावेळी अनेक पर्याय आले व परिणामी विरोधकांनी एकेमेकांची मते मोठ्या प्रमाणात फोडली. याचा मोठा लाभ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला  झाला आणि आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा प्रमोद सावंत यांचा मार्ग मोकळा झाला.

काँग्रेसच्या व्होट बँकेला सुरुंग
गोव्यातील एकूण साडेअकरा लाख मतदारांपैकी २५ टक्के मतदार हे अल्पसंख्यांकांमधील आहेत. ख्रिस्ती मते पूर्वी काँग्रेसलाच मिळायची. यावेळी आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स असे तीन पर्याय मतदारांसमोर आले. शिवाय भाजपने मुद्दाम प्रथमच १२ ख्रिस्ती उमेदवार रिंगणात उतरविले. दक्षिण गोवा जिल्ह्यात खासदार काँग्रेसचा आहे पण तिथे काँग्रेसला जास्त मतदारसंघ जिंकता आले नाही. आप, तृणमूल काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षांनी काँग्रेसच्या व्होट बँकेला सुरुंग लावला. आप प्रथमच यावेळी विधानसभेच्या दोन जागा जिंकला. 

उत्तराखंड : सलग दुसऱ्यांदा सत्तेचा मान भाजपकडे
- प्रदीप तत्सत
डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा मान पटकावला. ७० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची कामगिरी किंचित सुधारली.

गड आला पण... मुख्यमंत्री धामी पराभूत
राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खतिमा मतदारसंघात काँग्रेसचे भुवनचंद्र कापरी यांनी ६ हजार ५७९ मतांनी पराभव केला. वार्ताहरांशी बोलताना धामी म्हणाले, ‘व्हीजन डाॅक्युमेंटमध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली. अतिशय मोठे यश दिल्याबद्दल मतदारांचे आभार.’ समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या स्वत:च दिलेल्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. धामी पराभूत झाल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण असेल, हा सध्या प्रश्न आहे. भाजपचे कैलाश गाहातोडी यांनी धामी यांच्यासाठी आमदारकी सोडण्याची तयारी दाखवली आहे.

मणिपूर : सुशासनाला मिळाली जनतेची पसंती
- राजेश पिल्लेवार
इम्फाळ : दहशतवादग्रस्त मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्तेकडे आगेकूच केली आहे. पाचव्यांदा आमदारकी जिंकणारे नाँगथाँबन बिरेन सिंग यांनी पक्षाला बहुमत मिळवून दिले. दहशतवादापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी आणि वेगवेगळ्या आदिवासी जमातींमधील मतभेद व कटुता यांची दरी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरले.

नितीशकुमारांचा जलवा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार 
यांच्या संयुक्त जनता दलाने मणिपूरमध्ये कमाल केली आहे. पक्षाने सहा जागी विजय मिळवला. आणखी दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर होते. २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती.  

Web Title: Uttar Pradesh Assembly Election Results 2022: Not lotus flower, BJP fire is fire! Schemes fell heavily on racial equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.