Uttar Pradesh Assembly Election: मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 10:41 IST2022-01-19T10:40:09+5:302022-01-19T10:41:06+5:30
राजकीय नेत्यांची ही स्पर्धा राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे.

Uttar Pradesh Assembly Election: मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा
- राजेंद्र कुमार
लखनौ : उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलेले असताना मोठ्या नेत्यांमध्ये आपल्या मुलामुलींना तिकीट मिळवून देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत राज्यपाल, तीन केंद्रीय मंत्री, एक शाही इमाम व अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख, संसद सदस्य आणि आमदार यांचा समावेश आहे. राजकीय नेत्यांची ही स्पर्धा राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे.
मोठ्या नेत्यांकडून मुलामुलींना तिकीट मागण्याची सर्वांत मोठी यादी भाजपकडे आहे. जो भाजप घराणेशाहीविरुद्ध बोलत असतो, त्याच पक्षात राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र मुलासाठी अमित यांच्यासाठी तिकीट मागत आहेत. त्याचप्रमाणे बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांचे चिरंजीव रामविलास चौहान मऊच्या मधुबन मतदारसंघातून तिकीट मागत आहेत. उत्तराखंडमध्ये राज्यपाल राहिलेल्या देवी राणी मौर्य यांना आग्रा येथून तिकीट मिळाले आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह गौतम बुद्धनगरचे आमदार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा याच मतदारसंघातून तिकीट मिळविले आहे. आता राजनाथ सिंह यांचे दुसरे चिरंजीव नीरज सिंह लखनौच्या एका मतदारसंघातून तिकीट मागत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी मुलगा दिलीप यांच्यासाठी उन्नावच्या पूरवा येथून तिकीट मागितले आहे. केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी पत्नीसाठी टुंडला येथून तिकीट मागितले आहे; तर केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या पत्नी जय देवी अलाहाबादमधून आमदार आहेत.
जावई आणि पतीलाही हवे विधानसभा निवडणुकीचे तिकीट
भाजपतून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य यांना स्वत:साठी आणि मुलासाठी तिकीट हवे आहे. ‘सपा’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनाही मुलासाठी तिकीट हवे आहे.
‘सपा’सोबत आघाडीत असलेल्या कृष्णा पटेल यांना मुलगी पल्लवीसाठी तिकीट हवे आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनीही मुलासाठी तिकीट मागितले आहे. अखिलेश यादव यांनी त्यासाठी होकार दिला आहे.
‘सपा’चे संसद सदस्य शफीकुर्रहमान वर्क यांनी नातवासाठी आणि दिल्लीतील इमाम मौलाना बुखारी यांनी जावई उमर अली खान यांच्यासाठी बेहटमधून तिकीट मागितले आहे.
‘सपा’च्या डझनभर संसद सदस्यांनी आणि आमदारांनी आपल्या मुलामुलींसाठी तिकीट मागितले आहे.
बसपातही अनेक नेत्यांनी मुलासाठी तिकीट मागितले आहे. ‘बसपा’च्या प्रमुख मायावती यांनी तर भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी घोषित केले आहे.
बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र हे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि सहकाऱ्यांना पक्षात पुढे करीत आहेत. सतीशचंद्र मिश्र यांच्या पत्नी कल्पना, मुलगा कपिल आणि जावई परेश हे पक्षाला साथ देत आहेत.