Uttar Pradesh Assembly Election: 'दंगल-हाणामारी करा, पण उमेदवाराला विजयी करा', माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:59 AM2022-02-17T09:59:59+5:302022-02-17T10:00:51+5:30
Uttar Pradesh Assembly Election: या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रयागराज: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचे (Uttar Pradesh Assembly Election) दोन टप्पे पार पडले असून सर्व राजकीय पक्ष तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारादरम्यान एका माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. 'निवडणूक जिंकण्यासाठी दंगल आणि हिंसाचार करा', असे वक्तव्य प्रयागराजचे माजी आमदार आणि सपाविरोधात बंड करुन भाजपमध्ये दाखल झालेले रामसेवक पटेल यांनी केले आहे.
समर्थकांना कोणत्याही थराला जाण्याचा सल्ला
प्रयागराजमधून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना माजी आमदार रामसेवक पटेल म्हणाले की, 'उमेदवाराला विजयी करण्यासाठी दंगल झाली तरी हरकत नाही, पण उमेदवार विजयी झाला पाहिजे.' प्रयागराजमध्ये येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी रामसेवक पटेल यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही मर्यादा ओलांडण्याचा सल्ला दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले माजी आमदार?
मांडा भागात भाजप उमेदवार नीलम कारवारिया यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत माजी आमदार रामसेवक पटेल यांच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला. दंगल झाली तरी उमेदवाराला विजयी करा, असे रामसेवक पटेल यांनी मंचावरुन सांगितले. रामसेवकाचा हा व्हिडिओ मेढा विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
रामसेवकाचा हा प्रक्षोभक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मांडा पोलिस ठाण्यात रामसेवक आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भडकाऊ भाषण आणि एका विशिष्ट जातीबद्दल अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे.