Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात यंदा सत्तापालट होणार?; सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 08:46 AM2022-01-24T08:46:37+5:302022-01-24T08:50:17+5:30
Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर
उत्तर प्रदेश: लोकसभेच्या आगामी निवडणुकीची सेमी फायनल मानली जाणारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसोबतच विरोधकांनीदेखील कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेचे ४०३ मतदारसंघ आहेत. राज्यात एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. १० मार्चला निकाल जाहीर होईल.
राज्यात भाजपचंच सरकार कायम राहील असा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. तर विरोधकांना सत्ताबदलाचा विश्वास आहे. समाजवादी पक्ष भाजपला चांगली टक्कर देताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील जनता योगी सरकारच्या कामाबद्दल समाधानी आहे का? या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलायचं आहे का? या प्रश्नांची उत्तरं समोर आली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून मतदारांची मन की बात समोर आली आहे.
योगी सरकारवर नाराज आहात आणि ते बदलण्याची इच्छा आहे का, या प्रश्नाला ४७ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं. तर सरकारच्या कामकाजावर नाराज आहोत, पण ते बदलण्याची गरज वाटत नाही, असं मत २७ टक्के लोकानी व्यक्त केलं. सरकारवर नाराज नाही, त्यामुळे ते बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असं मत २६ टक्के लोकांचं आहे.