Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; राम मंदिर परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 09:05 PM2022-06-01T21:05:53+5:302022-06-01T21:06:45+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचा शिलान्यास केला.
अयोध्या: उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने अयोध्येतील राम मंदिर परिसरातील दारुच्या दुकानांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) नितीन अग्रवाल यांनी मंगळवारी माहिती दिली की, अयोध्येतील 'श्री राम मंदिर' परिसरातील सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. बहुजन समाज पक्षाचे सदस्य भीमराव आंबेडकर यांनी उत्पादन शुल्क नियम, 1968 मध्ये केलेल्या सुधारणांच्या स्थितीची माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचे शिलान्यास केला. आदित्यनाथ यांनी पहिला कोरीव दगड गर्भगृहात ठेवून समारंभात भाग घेतला. यावेळी देशभरातील साधू-संतांना निमंत्रित करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांच्या मते, राम मंदिराचे गर्भगृह लाल दगडांनी बनवले जाईल.
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, मंदिराचे गर्भगृह जानेवारी 2024 (मकर संक्रांती) पर्यंत तयार होईल. यानंतर भगवान रामाची मूर्ती ठेवली जाईल आणि लोक दर्शन घेण्यासाठी येऊ शकतील. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "भक्तांना एका विशाल आणि सुंदर मंदिराची अपेक्षा आहे. सूर्योदय झाल्यावर पहिली किरण रामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराची निर्मिती केली जात आहे."