लव्ह जिहाद: "अकरम कुरैशीनं अक्षय होऊन केली मैत्री, गर्भवती झाल्याचं समजताच धर्मांतरासाठी सुरू केला छळ"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 12:53 PM2020-11-19T12:53:00+5:302020-11-19T12:54:32+5:30
आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओदेखील तयार केला. जेव्हा पीडिता लग्नाचा विषय काढत होती, तेव्हा आरोपी अकरम तिला हा अश्लील व्हिडिओ दाखवत असे.
बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका खासगी रुग्णालयातील नर्सने डॉक्टरवर लव्ह जिहादचा गंभीर आरोप केला आहे. मुस्लीम डॉक्टरने ओळख लपवून हिंदू नर्सला प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि तब्बल 7 महिने तिचे शारीरिक शोषण केले. यानंतर जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा या डॉक्टरने तिच्यासमोर धर्म बदलण्याची अट ठेऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला, असा आरोप आहे. पीडित नर्सने असे करण्यास नकार दिला असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात, डॉक्टरची पहिली पत्नी आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी डॉक्टर अकरमचा पोलीस शोध घेत आहेत, असे बागपतचे एएसपी मनीष मिश्रा यांनी सांगितले.
आरोपानुसार, खासगी रुग्णालयातील एका मुस्लीम डॉक्टरने आपली ओळख लपवून संबंधित नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत सात महिने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर धर्म परिवर्तवाची अट ठेऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नर्स सहा महिन्यांची गर्भवती आहे. तिने बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बंदी बनवून दिला त्रास - पीडितेचा आरोप -
पीडित नर्सने आरोप केला आहे, की अकरमने तिला बंदी बनवून प्रचंड त्रास दिला. आरोपी अकरम विवाहित आहे. त्याला दोन मुलेही आहेत. त्याने त्याचे नाव बदलून अक्षय असल्याचे सांगत तिच्याशी मैत्री केली. एवढेच नाही, तर अकरमने आपण घटस्फोटित असल्याचे सांगत तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. त्याने 7 माहिने खोटे बोलून पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओदेखील तयार केला. जेव्हा पीडिता लग्नाचा विषय काढत होती, तेव्हा आरोपी अकरम तिला हा अश्लील व्हिडिओ दाखवत असे. संबंधीत पीडिता खेकडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे.
उक्त प्रकरण में अभियोग पंजीकृत कर दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। शेष की गिरफ्तारी हेतु विशेष टीम गठित कर दी गई है। अपर पुलिस अधीक्षक बागपत द्वारा दी गई बाइट। pic.twitter.com/YzXLDS847H
— Baghpat Police (@baghpatpolice) November 19, 2020
आरोपी अकरमच्या पत्नीवरही मारहाणीचा आरोप -
संबंधित पीडिता गर्भवती झाल्यानंतर डॉ. अकरमने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. तसेच तिने गर्भपातास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जबर मारहाणही केली. याशिवाय धर्मपरिवर्तनासाठीही दबाव टाकला. पीडित नर्सने आरोपी अकरमच्या पत्नीवरही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने म्हटले आहे, की ती मंगळवारी अकरमच्या घरी गेली होती. तेव्हा अकरमच्या पत्नी आणि भावाने तिला मारहाण केली. तिच्या पोटावर पाय मारला. गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिची प्रकृती खालावली. मात्र, ती कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांकडे धाव घेत तिने तक्रार केली. पीडित नर्सने बागपत एसपींना लेखी तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.