उत्तर प्रदेशात भाजपाचा सपावर जोरदार पलटवार, थेट मुलायमसिंह यांचे नातेवाईक हरिओम यादव यांना दिला पक्षात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 04:18 PM2022-01-12T16:18:45+5:302022-01-12T16:21:35+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: Swami Prasad Maurya यांना आपल्या जाळ्यात ओढत समाजवादी पक्षाने BJPला जबरदस्त धक्का दिला होता. मात्र याला २४ तास उलटत नाही तोच भाजपाने Samajwadi Partyवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपाने Mulayam Singh Yadav यांचे व्याही आणि फिरोजाबादमधील सिरसागंज या मतदारसंघातील आमदार Hariom Yadav यांना पक्षात प्रवेश दिला आहे
लखनौ - निवडणुकांची तारीख जाहीर होताच उत्तर प्रदेशमध्ये शह-काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. काल स्वामी प्रसाद मौर्य यांना आपल्या जाळ्यात ओढत समाजवादी पक्षाने भाजपाला जबरदस्त धक्का दिला होता. मात्र याला २४ तास उलटत नाही तोच भाजपाने समाजवादी पक्षावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपाने मुलायमसिंह यादव यांचे व्याही आणि फिरोजाबादमधील सिरसागंज या मतदारसंघातील आमदार हरिओम यादव यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांच्याबरोबरच सहारनपूर जिल्ह्यातील बेहट येथील काँग्रेस आमदार नरेश सैनी आणि सपाचे माजी खासदार धर्मपाल सैनी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
हरिओम यादव हे सिरसागंज विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तसेच ते सध्या समाजवादी पक्षातून निलंबित आहेत. हरिओम यादव यांना २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात समाजवादी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात ले होते. त्यांच्यावर पक्षाच्या मुख्य भूमिकेपासून वेगळं होऊन, पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. तसेच अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली होती.
हरिओम यादव यांची ओळख म्हणजे, ते मुलायमसिंह यादव यांचे व्याही आहेत. हरिओम यादव यांचे सख्खे भाऊ रामप्रकाश नेहरू यांची मुलगी मृदुला यादव हिचा विवाह मुलायमसिंह यादव यांचे पुतणे रणवीरसिंह यादव यांच्याशी झाला होता. रणवीरसिंह यादव यांच्या मृत्यूनंतर सैफई महोत्सव हा रणवीरसिंह यादव यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रणवीरसिंह यादव आणि मृदुला यांचे पुत्र तेजवीर यादव हे मैनपुरीचे माजी खासदार आहेत. तसेच ते अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हरिओम यादव यांनी भाजपाला मदत केली होती. त्यामुळेच फिरोजाबादमध्ये भाजपाचा विजय झाला होता. हरिओम यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते होते. मात्र त्यांचे आणि प्रा. रामगोपाल यादव यांच्यात तीव्र मतभेद होते. ते शिवपाल यादव यांचे निकटवर्तीय होते. मात्र शिवपाल यादव हे समाजवादी पक्षात परत गेल्यानंतर हरिओम यादव हे भाजपामध्ये दाखल झाले आहेत.