उत्तर प्रदेशात बोट उलटून २२ बुडाले, १५ जणांची क्षमता; बसले होते ६० प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:05 AM2017-09-15T01:05:36+5:302017-09-15T01:06:08+5:30
यमुना नदीत एक बोट उलटून २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. मृतांत बहुतांश शेतकरी आणि मजूर आहेत. या दुर्घटनेतील अनेक प्रवाशांना वाचविण्यात यश आले. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
बागपत : यमुना नदीत एक बोट उलटून २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. मृतांत बहुतांश शेतकरी आणि मजूर आहेत. या दुर्घटनेतील अनेक प्रवाशांना वाचविण्यात यश आले. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी भवानी सिंह यांनी सांगितले की, ही घटना बागपतपासून २० किमी अंतरावर घडली. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. यात बहुतांश महिला होत्या. बोट नदीच्या मध्यात आल्यानंतर बुडाली. पोलीस आणि बचाव पथकाने २२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, १२ हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी मदत करत आहेत. यातील बहुतांश लोक बागपतहून हरियाणात मजूरी करण्यासाठी जात होते. या बोटीची क्षमता १५ प्रवाशांची असताना ६० प्रवासी यात बसल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेनंतर मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून ते रस्त्यावर आले आहेत. पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू
पाटणा : जिल्ह्यातील मरांची येथे गंगा नदीत बुडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. यातील चार अल्पवयीन मुले आहेत. जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, हे लोक गंगा स्नान करण्यासाठी गेले होते. यावेळी एक दोन जण खोल पाण्यात गेले. ते बुडू लागले तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी अन्य लोकही पाण्यात उतरले. यात या सर्वांचा मृत्यू झाला.