उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्या संपणार 'सस्पेंस'
By admin | Published: March 17, 2017 04:08 PM2017-03-17T16:08:08+5:302017-03-17T16:21:38+5:30
उत्तरप्रदेशात ऐतिहासिक यश संपादन करणा-या भाजपाकडून मुख्यमंत्रीपदी कोणाला संधी मिळणार याविषयी माध्यमांमध्ये विविध तर्क-विर्तक सुरु आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 17 - उत्तरप्रदेशात ऐतिहासिक यश संपादन करणा-या भाजपाकडून मुख्यमंत्रीपदी कोणाला संधी मिळणार याविषयी माध्यमांमध्ये विविध तर्क-विर्तक सुरु आहेत. लवकरच या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून उद्या भाजपाकडून उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होईल. शनिवारी होणा-या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाईल अशी माहिती उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी दिली.
रविवारी 19 मार्चला नव्या मुख्यमंत्र्याचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. या कार्यक्रमाला सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित असतील असे मौर्य यांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थामुळे मौर्य यांना काल दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. मौर्य यांना पत्रकारांनी वारंवार मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत असा प्रश्न केला त्यावर त्यांनी उद्या चार वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यानंतर तुम्हाला नव्या मुख्यमंत्र्याचे नाव समजेल असे उत्तर दिले.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्याची निवड करण्याची जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे या पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जी काही जबाबदारी आहे ती मी पूर्ण करीन. निकाल लागल्यानंतर आठवडयाभराच्या आत भाजपाने गोवा, मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले पण उत्तरप्रदेशमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार असले तरी सध्या केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा या शर्यतीत आघाडीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे कार्ड वापरण्याची शक्यता आहे. मनोज सिन्हा यांची स्वच्छ प्रतिमा आणि नेतृत्वगुण पाहत मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता असल्याचं सुत्रांकडून कळत आहे. भाजपासमोर मुख्यमंत्रीपदासाठी असलेल्या पर्यायांमध्ये राजनाथ सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्या, दिनेश शर्मा आणि योगी आदित्यनाथ यांची नावे आहेत.