CoronaVirus News: "कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:42 PM2020-06-07T14:42:43+5:302020-06-07T14:45:18+5:30
''मोदींनी आधीच संकटाची जाणीव करून दिल्यानं परिस्थिती नियंत्रणात राखण्यात यश''
लखनऊ: देशावर कोरोना संकट आलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं नेतृत्त्व देशाला लाभणं आपलं नशीब असल्याचं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. कोरोना संदर्भातील धोक्यांची जाणीव मोदींनी आधीच करून दिली होती. या साथीशी दोन हात करण्यासाठी त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. भारताला नशिबानं पंतप्रधान मोदींसारखं नेतृत्त्व मिळालं आहे, अशा शब्दांत योगींनी मुक्तकंठानं मोदींची स्तुती केली. ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
उत्तर प्रदेशातल्या कोरोना परिस्थितीविषयी बोलताना योगींनी राज्य सररकानं मार्चपासून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केलं. 'कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळेच इतकी मोठी लोकसंख्या असूनही देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली. याशिवाय मृत्यूदरदेखील कमी राखण्यात यश मिळालं. उत्तर प्रदेश सरकारनं मार्चपासूनच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयारी सुरू केली होती. मोदींनी होळीशी संबंधित कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी कोरोना संकटाची चाहूल लागली होती,' असं आदित्यनाथ यांनी सांगितलं.
'मोदींनी दिलेल्या सूचनानंतर आम्ही लगेचच प्रशासनाच्या बैठका घेतल्या. शाळा, महाविद्यालयं आणि इतर शिक्षण संस्था टप्प्याटप्प्यानं बंद करण्याबद्दलच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तर २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला,' असं योगी म्हणाले. या संपूर्ण संकट काळात मोदींच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं.
'मोदींच्या मार्गदर्शनानुसार काम करून ज्या ज्या ठिकाणी निर्णय घेतले, त्या त्या ठिकाणी कोरोनावर मात करण्यात यश मिळालं. घडणाऱ्या घटनांबद्दल मोदींनी आधीच इशारा दिला होता. उत्तर प्रदेशसारख्या लोकसंख्येचं प्रमाण अतिशय जास्त असणाऱ्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यूदर कमी राहण्याच्या दृष्टीनं घेण्यात येणाऱ्या निर्णयांचे परिणाम आज दिसत आहेत. कोरोना संकटापासून राज्याला वाचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत,' असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
अभिनेता सोनू सूदवरुन भाजपा-शिवसेना आमनेसामने; संजय राऊतांच्या टीकेला राम कदमांचा टोला
अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत?; सोनू सूदवरील टिप्पणीनंतर मनसेचा संजय राऊतांना सवाल