फक्त आपलीच नाही, पत्नीसह मुला-मुलींची आणि सुनांचीही संपत्ती सांगा, CM योगींचं मंत्री-अधिकाऱ्यांना फरमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:31 PM2022-04-26T16:31:19+5:302022-04-26T18:05:05+5:30
योगी आदित्यनाथ मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींचे वर्तन पावित्र असणे अत्यंत आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आता झिरो टॉलरन्स धोरण हाती घतले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांसह आयएएस आणि पीसीएस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या संपत्तीचा तपशील मागवला आहे. यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांना केवळ आपल्याच नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती आता जनतेसमोर ठेवावी लागणार आहे.
योगी आदित्यनाथ मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींचे वर्तन पावित्र असणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेनुसार सर्व माननीय मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील तीन महिन्यांच्या आत स्वत:ची आणि कुटुंबातील सदस्यांची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर करावी.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'सर्व लोक सेवक (आयएएस/पीसीएस) यांनी आपली आणि आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची सर्व स्थावर/जंगम मालमत्तेची सार्वजनिक घोषणा करावी. तसेच ही माहिती सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन पोर्टलवरही उपलब्ध करण्यात यावी. याच बरोबर, मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठल्याही प्रकारच्या सरकारी कामात हस्तक्षेप करणार नाही.