CoronaVirus : आता 'या' राज्यात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्शन, सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:38 PM2021-04-27T16:38:49+5:302021-04-27T16:39:37+5:30
सरकारची ही घोषणा कोरोनाग्रस्तांसाठी मोठी दिलासादायक, एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि तेथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ते आवश्यक असेल, तर तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. (Remdesivir injection)
लखनौ - देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशलाही कोरोनाचा मोठा फटका सबला आहे. यातच, कोरोना संक्रमणाचा सामना करत असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा पट्रीवर आणल्यानंतर, आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा मोठी दिलासादायक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी म्हटले आहे, की राज्य सरकार सर्व सरकारी रुग्णालयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था करत आहे. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत दिले जाईल. तसेच राज्यातील खासगी रुग्णालयांना कंपन्या आणि बाजारातूनच रेमडेसिव्हिर खरेदी करावे लागेल.
बापरे! स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल; 700 जणांची फसवणूक, अनेकांचा जीव धोक्यात
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि तेथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी ते आवश्यक असेल, तर तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. याशिवाय, मागणी प्रमाणे, विविध जिल्ह्यांना मुबलक प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्यात यावे. जर आवश्यकता असेल, तर खासगी रुग्णालयांनाही निर्धारित दरांत रेमडेसिव्हिर द्यावात, असे आदेशही मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.
या दहा राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशामध्ये एका दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमध्ये सापडले आहेत. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत २८ कोटींहून अधिक सँपलची तपासणी झाली आहे. तसेच देशातील संसर्गाचा दर हा ६.२८ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ४८ हजार ७०० रुग्ण सापडले आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार ५५१ आणि कर्नाटकमध्ये २९ हजार ७४४ रुग्णांचे निदान झाले आहे.
देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ वर -
मंत्रालयाने सांगितले की, भारतामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून २८ लाख ८२ हजार २०४ एवढी झाली आहे. तर एकूण बाधिकांची संख्या ही १६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजारी रुग्णांच्या संख्येमध्ये ६८ हजार ५४६ ने वाढ झाली आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६९.१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान तामिळनाडू, गुजरात आणि केरळमध्ये आहेत. देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी १६.४३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ८२.५४ टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
बायकांची पाळी, कोरोनाची लस आणि इम्युनिटी ! -समाजमाध्यमी अफवांच्या चक्रात अडकण्यापूर्वी हे वाचा